सरडेवाडी - रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्या मृतदेहाची ओळख पटली

मृतदेहाच्या शेजारी रक्ताने माखलेला दगड, गळा आवळल्याच्याही खुणा; खून झाल्याचा प्राथमिक अंदाज

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१३ जुलै) :- रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका २६ वर्षीय तरुणाचा मृतदेह काल (१२ जुलै) सरडेवाडी (ता. इंदापूर) हद्दीत आढळून आला होता. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आलेल्या या खळबळजनक घटनेतील मृतदेहाची ओळख आता पटली असून, तरुणाचे नाव प्रदीप रघुनाथ पवार (रा. रामतीर्थ तांडा, जळकोट, कर्नाटक) असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या तरुणाच्या डोक्यावर, कानाजवळ, डाव्या भुवईवर गंभीर व किरकोळ स्वरूपाच्या जखमा आढळून आल्या आहेत. मृतदेहाशेजारीच रक्ताने माखलेला दगड आणि गळ्यावर फास दिल्यासारखे काळे व्रण आढळल्याने या तरुणाचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या संदर्भात तरुणाच्या नातेवाईकांनी अद्याप कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही.

काल हा मृतदेह बापूराव सहदेव सिद (रा. सरडेवाडी, ता. इंदापूर) यांच्या उसाच्या शेतात आढळून आला होता. सकाळी मुलांना शाळेत सोडायला जात असताना त्यांना पुणे सोलापूर महामार्गानजीक गलांडवाडी नं. २ कडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर रक्त सांडल्याचे दिसले. त्यावेळी त्यांनी शेतातील उसाकडे पाहिले असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ याची पोलिसांना खबर दिली होती.

दरम्यान ही घटना समजताच इंदापूर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, योगेश लंगोटे, सहा. फौजदार युवराज कदम, पो.काॅ. विनोद लोखंडे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांना या तरुणाच्या खिशात एसटीचे तिकीट आणि मृतदेहाशेजारी फास्ट टॅग आणि मोबाईलचा हेडफोन आढळून आला होता. या संदर्भात इंदापूर पोलीस तांत्रिक बाबी तपासून पाहत आहेत. त्यामुळे लवकरच घटनेचे रहस्य उलघडेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट