धक्कादायक - फायनान्स कंपनीने गाडी ओढून नेली; आधी पत्नीने, दुसऱ्या दिवशी पतीने गळफास घेऊन संपवले जीवन

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१७ जुलै) :- टाटा मोटर्स फायनान्स लि. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गाडी ओढून नेल्याने एका जोडप्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील निंबोडी (लुमेवाडी) येथे घडली. सुलभा संतोष माने (वय ४० वर्ष) आणि संतोष महादेव माने (वय ४५ वर्ष) अशी या जोडप्याची नावे असून, २६-२८ जून दरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेबाबत वसंत आप्पा माने (रा. निंबोडी, लुमेवाडी, ता. इंदापूर) यांनी १५ जुलै रोजी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून बाळासाहेब पाटोळे याच्यासह फायनान्स कंपनीच्या अन्य तिघा कर्मचाऱ्यांच्या विरोधात कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या टाटा मोटर्स फायनान्स लि. कंपनीच्या वरील कर्मचाऱ्यांनी संतोष माने यांनी कंपनीकडून घेतलेली झेस्ट एक्सई (एमएच एक्यू ९९४५) ही चारचाकी हफ्ता थकल्याने २६ जून रोजी ओढून नेली होती. तदनंतर प्रयत्न करूनही या जोडप्याला फायनान्स कंपनीचे थकलेले हफ्ते भरण्यासाठी रक्कम जमवता आली नाही. घडल्या घटनेनंतर प्रथम सुलभा माने यांनी त्याच दिवशी (२६ जून) आपल्या राहत्या घरी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. तर पत्नीच्या सावडण्याच्या दिनी, म्हणजे २७ आणि २८ जून दरम्यानच्या रात्री संतोष माने यांनी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, पत्नीच्या आत्महत्येनंतर माझी बेकारी झाली, माझी अब्रू गेली, सुलभाही गेली. हे सगळं त्या फायनान्स कंपनीमुळे झालं. माझ्याकडे आता कोणताच पर्याय राहिला नाही असं संतोष माने आपल्याला म्हटल्याचे, तथा फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मृत जोडप्याच्या घरात घुसून गाडीची चावी घेतल्याचे, सुलभा माने यांच्याशी झटापट केल्याचे, त्यांना दमदाटी केल्याचे फिर्यादी यांनी म्हटले आहे. फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या जोडप्याला दिलेल्या मानसिक आणि आर्थिक त्रासामुळे हे जोडपे आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचेही फिर्यादी यांनी म्हटले आहे. दरम्यान, या घटनेतील सर्व आरोपी अद्याप फरार असून, या घटनेच्या अन्य बाजू, एकूण पार्श्वभूमी, सत्य आणि तथ्य आपण तपासत असल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट