त्यांचा स्पाय कॅमेरा होता खास; मात्र इंदापूर पोलीस निघाले त्यांचेही बॉस
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (१४ जुलै) :- इंदापूर बसस्थानकाच्या व्यापारी संकुलातील इंडिकॅश कंपनीचे दोन एटीएम फोडून १७ लाख ५५ हजारांची रोकड चोरणाऱ्या दोघा परप्रांतियांना इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने बड्या शिताफीने बेड्या ठोकल्या. रचपाल बलदेव सिंह (वय ३६ वर्षे, रा. बाबा दिपसिंग नगर, रोड नंबर १, भंटिडा, पंजाब) आणि लखवीर बलदेव सिंह (वय २९ वर्षे, रा. रायखाना, ता. तलवंडी सापो, जि. भंटिंडा, पंजाब) अशी दोघा आरोपींची नावे आहेत. या दोघांना इंदापूर पोलिसांनी त्यांच्या राहत्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. ८ जून रोजीच्या या घटनेतील आरोपींनी चोरी करण्यासाठी खास स्पाय कॅमेरा वापरला होता. तब्बल महिन्याभराची मेहनत आणि विविध ठिकाणचे सीसीटिव्ही कॅमेरे तपासल्यानंतर पोलिसांनी या उडत्या पंजाबचे पंख छाटले.
संबंधित कंपनीचे कर्मचारी नितीन पांडुरंग भानवसे (रा. संवदने, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांनी २६ जून रोजी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. चलाखी आणि चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने आरोपींनी केलेल्या या कृत्याआधीही त्यांनी महाराष्ट्रातील सुपे (बारामती), तळेगाव (पुणे), गोवंडी (मुंबई), राजस्थानातील गंगापूर, कोटा, पंजाबमधील पठाणकोट आणि उत्तराखंड राज्यात अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी म्हटले आहे. इंदापूर न्यायालयाने या दोघांनाही ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शातिर दिमाग चोरीचा हा सर्व घटनाक्रम आणि चोरट्यांच्या नेहल्यावर देहला ठरलेले पोलीस पाहता असच म्हणावं लागेल, " त्यांचा स्पाय कॅमेरा होता खास, मात्र इंदापूर पोलीस निघाले त्यांचेही बॉस."
चोरट्यांचा दिमाग शातिरच - न दिसेल अशा ठिकाणी स्पाय कॅमेरा लावला
रचपाल सिंह हा आरोपी पुर्वी बँकेत काम करीत होता. त्यामुळे त्याला एटीएम मशीनबाबत पूर्ण माहिती होती. त्याने संबंधित एटीएम मशीनच्या पैसे भरण्याच्या कॅसेटजवळ न दिसेल अशा ठिकाणी स्पाय कॅमेरा बसवला होता. संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एटीएममध्ये कॅश भरतानाचे रेकॉर्डिंग या कॅमेऱ्यात झाले होते. आरोपींनी याच स्पाय कॅमेऱ्याच्या रेकॉर्डींमधून एटीएमचे पासवर्ड ओळखले. परिणामी काही मिनिटांतच १७ लाख ५५ हजार रु. चोरून दोघे पसार झाले.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, सफौ. प्रकाश माने, पो.हवा. ज्ञानेश्वर जाधव, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस कॉन्टेबल नंदू जाधव, गजानन वानोळे, होम. संग्राम माने यांनी केली असून, या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा