मामा ! भाजप जातीवादी पक्ष होता ना? भाजप सेक्युलर झाला? का तुम्ही जातीवादी?
संपादकीय
एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आदर्श घेत विरोधी पक्ष नेते व राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे आता शिंदे फडणवीस सरकारचा हिस्सा झाले आहेत. राष्ट्रवादीचे २५ हून अधिक आमदार आणि खासदार शिवसेना आणि भाजप नेत्यांबरोबर राजभवनात लंकेवर विजय मिळवल्याच्या आविर्भावात आनंदोत्सव साजरा करताना दिसत होते. यामध्ये शरद पवारांचे मानस पुत्र दिलीप वळसे पाटील, छगन भुजभळ, संजय बनसोडे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि इंदापूरचे विद्यमान आणि लाडके आमदार दत्तात्रय भरणे सामिल आहेत. बहुतेक बंडखोर आमदारांवर ईडीची नजर होती. त्यामुळे याचा अर्थ लावायला जनता शहाणी आहे. त्यातच आता पन्नास खोके एकदम ओके कोणी कोणाला म्हणायचं? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
अजित पवार यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची पाचव्यांदा शपथ घेतली. आठ बंडखोर आमदारदेखील मंत्रिपदाच्या घोड्यावर स्वार झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते सध्या शॉक विथ संभ्रमात आहेत. तर अनेकांचे सेलिब्रेशन चालू आहे. किंतू परंतु अजित पवारांचे बंड महाराष्ट्राला नवे अजिबात नाही. पहाटेचा तो शपथविधी महाराष्ट्र अजूनही विसरलेला नाही. मात्र आपल्या भाषणांमध्ये आणि खाजगीतही जातीवादी पक्ष म्हणून पोटतीकडीने भाजपवर टीकास्त्र सोडणारे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणेही बंडखोरांच्या रांगेत उभे असल्याने इंदापूरकर आश्चर्य व्यक्त करत आहेत.
दरम्यान, दत्तात्रय भरणे आपल्या भाषणांमध्ये आणि खाजगीतही सातत्याने भाजपला जातीवादी आणि हिंदू मुस्लिम यांच्यात भांडण लावणारा पक्ष म्हणून टीका करत होते. आता मात्र भाजपला कडकडून गळाभेट दिल्याने मामा ! भाजप जातीवादी पक्ष होता ना? भाजप सेक्युलर झाला? का तुम्ही जातीवादी? असा सवाल भरणे यांना सेक्युलर इंदापूरकर विचारतील हे निश्चित. नुकतेच निमगाव केतकी येथील व्याहाळी चौकात आपुलकीने हस्तांदोलन करण्यासाठी मामांच्या जवळ जाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीला डावलत मामा पुढे गेल्याची, त्यामुळे "मामांचे हे कृत्य जाणीवपूर्वक की नजरचुकीने? मुस्लिमांबद्दल मामांच्या मनात किती आदर?" असा सवाल उपस्थित करणारी बातमी वायरल झाली होती. त्यांच्या या कृत्यातील तथ्य देव जाणे. तसे नसेलही. ती बातमी आता डिलिट झाली असली तरी तो प्रश्न मात्र अद्यापही कायम आहे? आज भाजपसोबत गेल्याने तो प्रश्न अधिकच गडद झालाय? मामा ! इंदापूरच्या जनतेने तुम्ही जातीवादी म्हणत होता त्या भाजपची विकेट काढत तुम्हाला यासाठीच निवडून दिले होते? जनतेचा हा विश्वासघात नव्हे? बंडापूर्वी तुम्ही मतदारांना, कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले? असे अनेक प्रश्न उपस्थित होतील. नेते वेळप्रसंगी जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या भावनांना कसं कोलतात हे इंदापूरच्या जनतेने पुन्हा एकदा पाहिलं. असो नसो ! मात्र अशा घटना लोकशाहीला घातक आहेत हे नक्की.
दुसरा मुद्दा म्हणजे भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या दरम्यान विकासकामांवरून होणाऱ्या वादाची. या बंडानंतर दोघेही एकाच गोठात आहेत असं म्हणायला आता हरकत नाही. परिणामी भरणे आणि पाटील यांच्यात विकासकामांवरून रंगणारा कलगीतुरा आता पाहायला मिळेल? किंबहुना विकासकामांची उद्घाटने आता दोघे एकत्र करणार? भविष्यात जागावाटपानंतर इंदापूर विधानसभेची जागा अजित पवार गटाकडे गेल्यास हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेणार? पाटील यापुढेही भरणेंवर भ्रष्टचाराचे आरोप करतील? इंदापूरच्या सेक्युलर जनतेने आता कोणाला मत द्यायचं? आजवर मामांनी जातीवादी ठरवलेल्या भाजपला? का जातीवादी भाजपबरोबर गेलेल्या मामांना? असे अनेक सवाल सेक्युलर इंदापूरकरांच्या मनात निर्माण झाले असतील. मात्र इंदापूरकरांनी आता तिसरा पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. काँग्रेस या पोकळीचा कितपत फायदा घेणार हे काळच ठरवेल.
सोबतच २०१९ मध्ये पहाटे झालेल्या शपथविधीची ही पुनरावृत्ती तर नाही ना? पवार काका पुतण्यांनी केलेली ही गेम तर नाही ना? असाही सवाल अनेकांना पडला असेलच. काहीही असो, सध्या तरी जनतेसमोर "तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे" हाच पर्याय असल्याचे दिसत आहे.

भरणे यांनी स्वताच्या स्वार्थासाठी इंदापूरच्या जनतेला फसवल. त्यांच्याशी गद्दारी केली. जनता त्यांना धडा शिकवेल.
उत्तर द्याहटवाBhavdi MLA Pravin bhaya mane 💥
उत्तर द्याहटवा