लाईटच्या खांबाचा करंट लागल्याने ५ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; दर्गा मस्जिद चौकातील घटना
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर शहरातील दर्गा मस्जिद चौकातील स्ट्रीट लाईटच्या खांबाचा करंट लागल्याने एका ५ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली असून, कुलसूम हैदर मुशाहिदी असे या मुलीचे नाव आहे. दुर्दैवी घटनेमुळे महावितरण आणि नगरपरिषदेच्या एकूणच निष्काळजी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
या घटनेनंतर त्या चिमुकलीला तात्काळ नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तदनंतर पुढील कारवाईसाठी कुलसूमला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. सदर घटनेत या चिमुकलीचा कान आणि पाठीला जखम झाली आहे. घटना घडल्यानंतर महावितरणने संबंधित ठिकाणची लाईट कनेक्शन बंद केले असून, तपासणीअंती खांबाला करंट असल्याचे निष्पन्न झाल्याचे नागरिक सांगत आहेत.. बारामतीहून तपासणीसाठी पथक बोलावण्यात आले असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तोंडी म्हटले आहे. या पथकाच्या तपासणीनंतर नेमके कारण कळेल असेही त्यांनी म्हटले आहे.
याच चौकात लाईटचा डीपी आहे. नेहमी गर्दी असलेल्या या चौकातील हा डिपी धोकादायक असल्याने इतर ठिकाणी हलवला जावा अशी मागणी अनेकवेळा स्थानिकांकडून केली गेली आहे. मात्र यावर कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे महावितरण तथा नगरपरिषदेला नेमकं काय अपेक्षित आहे असा सवाल उपस्थित होत आहे. अशा अनेक घटना याआधीही घडल्या आहेत. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी, पालखीची वेळ वगळता कधीही कोणत्याही ठिकाणी नगरपरिषद अथवा महावितरणने डीडबल्यूसी फायबरच्या संरक्षक पाईप्स कोणत्याही खांबाला लावल्या नाहीत. दर्गा मस्जिद चौकातील डीपी जवळच्या लाईटच्या खांबांना बेकायदेशीरपणे मोठमोठे होर्डिंग्ज लावण्यात येतात. मात्र प्रशासनाने यांवर आजवर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे महावितरण आणि नगरपरिषदेच्या एकूणच गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा