बिग ब्रेकिंग - दत्तात्रय भरणेंना बंडखोरीचं गोड फळ मिळणार; आज-उद्या राज्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता; सूत्रांची माहिती

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (११ जुलै) :- अजित पवार नुकतेच भाजप सेना (शिंदे गट) गटाशी हातमिळवणी करत सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्याबरोबर बंडखोरी करणाऱ्यांमध्ये माजी राज्यमंत्री तथा इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे देखील सामिल होते. बंडखोरीची कारणे कोणतीही असो, मात्र बंडखोरीचे गोड फळ दत्तात्रय भरणे यांना मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या संदर्भात दत्तात्रय भरणे आज सायंकाळी किंवा उद्या राज्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. असे झाल्यास ही बंडखोरी भरणेंच्या पथ्यावर पडली असेच म्हणावे लागेल.

अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची, तर बंडखोरांपैकी ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ ६ जुलै रोजीच घेतली होती. तर अजित पवार गटातील आणखी काही जणांना मंत्रिपद दिले जाईल अशी शक्यता गृहीत धरली जात होती. पैकी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे नाव आता राज्यमंत्री पदाच्या शर्यतीत समोर येत आहे. ते आज उद्या शपथ घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. इंदापूर तालुक्यातील त्यांचे कार्यकर्ते या शपथविधीसाठी मुंबईला रवाना होतील अशी शक्यता आहे. सूत्रांची माहिती खरी ठरल्यास दत्तात्रय भरणे आमदारकीच्या कारकीर्दीत दुसऱ्यांदा राज्यमंत्री पदाची शपथ घेतील.

याआधी भरणेंनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन या विभागांचे राज्यमंत्री पद भूषविले आहे. सूत्रांची माहिती खरी ठरल्यास बंडखोरीचं हे फळ भरणेंसाठी गोड, तर भरणेंचे मंत्री पद माजी आमदार, माजी मंत्री, तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची २०२४ ची वाट बिकट करणारं ठरेल हे निश्चित.

त्यामुळे पाटील यांना विधानपरिषदेवर संधी मिळेल?

न्यायालयाने आज राज्यपाल नियुक्त १२ आमदारांवरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. भाजप सेनेने दिलेल्या तत्कालीन यादीमध्ये पाटील यांचे नाव नसले तरी, आजची राजकीय परिस्थिती मात्र बदलली आहे. त्यामुळे यादीही बदलू शकते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर भाजपला मिशन बारामती सोप्प झालं असलं तरी अजित पवार आणि त्यांचा गट बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपला मदत करेल अशी शक्यता कमीच आहे. रोहित पवारांचे वक्तव्य याकडेच दिशानिर्देश करत आहे. याची जाण भाजपला असेलच. त्यातच आजची राजकीय परिस्थिती कायम राहिल्यास स्टॅण्डींग आमदार म्हणून इंदापूर विधानसभेची जागा भरणेंना द्यावी लागेल. त्यामुळे भाजप बारामती लोकसभा मतदार संघात आपली पाळेमुळे मजबूत करण्यासाठी, तसेच पाटील यांनी वेगळा विचार करू नये यासाठी भाजप पाटील यांना विधानपरिषदेवर संधी देईल अशी शक्यता नाकारता येणार नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट