रथ बाजूला घे म्हणण्याचे कसूर महागात पडले; झोपमोड झालेल्या कुंभकर्णाने एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टरला बेदम मारले...अहो ! हे रामायण पोलीस ठाण्याच्या पर्वतानजीकच घडले

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (२० जुलै) :- "वाहतुकीला अडथळा होतोय, टमटम बाजूला घे" म्हणाल्याने इंदापूर आगारच्या एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टरला मारहाण केल्याची धक्कादायक घटना इंदापूर पोलीस ठाण्याच्या अवघ्या काही मीटर अंतरावर घडली. मंगळवारी (१८ जुलै) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेसंदर्भात सचिन अर्जुन हेगडे (रा. शेळगाव, वालचंदनगर, ता. इंदापूर) या एसटी बस चालकाने इंदापूर पोलीस ठाण्यात टमटम चालकाविरोधात भा.द.वि. ३५३, ४२७, ५०४, ५०६ कलमांतर्गत तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी बस चालक आपल्या ताब्यातील बस (एमएच १४ बीटी ४८६३) आजोती गावाकडे घेऊन जात असताना पोलीस ठाण्याच्या नजीक, पोलीस चाळीच्या अगदी समोर हा प्रकार घडला. टमटम (एमएच १२ एयू २२०४) रस्त्याच्या मध्यभागी उभा असल्याने कालठण रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी टमटममध्येच झोपलेल्या चालकाला आपला टमटम बाजूला घे बाबा असा उपदेश बस चालकाने केला. मात्र नैतिक अध: पतनाच्या या कलयुगात उपदेश करणेही महागात पडू शकते हे बस चालकाला कळून चुकले. झोपमोड झाल्याने खवळलेल्या या कुंभकर्णाने फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केली.

मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या बस कंडक्टर सोमनाथ कुंडलीक गरगडे (रा. निरनिमगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनाही टमटम चालकाने मारहाण केली. टमटम चालकाने वारंवार आपल्या अंगावर टमटम घालण्याचाही प्रयत्न केल्याचे फिर्यादी यांनी म्हटले आहे. मात्र बस चालकांवरही अनेकवेळा चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्याचे, उद्धट वर्तन केल्याचे आरोप होतात. त्यामुळे योग्य बाजू कोणाची? अयोग्य कोण? मारहाण करणारा कुंभकर्ण चालक नेमका कोण? हे तपासात निष्पन्न होईल. सपोनी धनवे ते तपासत आहेत.

सदर घटनेनंतर फिर्यादी यांनी बस इंदापूर पोलीस ठाण्यात घेत फिर्याद दाखल केली. याआधीही इंदापूर आगाराच्या हर्षल रघुनाथ ठोसरे (रा. कळंब, ता. इंदापूर, जि. पुणे) या एसटी चालकाला जीवे मारण्याची धमकी आणि मारहाण केल्याची घटना २६ एप्रिल रोजी गोखळी (ता. इंदापूर) हद्दीत सोनाई पेट्रोल पंपानजीक घडली होती. तदनंतर आता पोलीस ठाण्याच्या शेजारी घडलेल्या या घटनेमुळे एसटी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट