शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या वीज तोडणी विरोधात डोंगराई चौकात आज हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा रास्ता रोको

आप्पासाहेब जगदाळे, पृथ्वीराज जाचक, अविनाश घोलप हे देखील होणार आंदोलनात सामील

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (८ मार्च) :- ऐन उन्हाळ्यात पिके तहानलेली असताना थकीत वीज बिलांच्या वसुलीचे नाटक महावितरणने पुन्हा सुरू केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असून, वीजे अभावी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने शेती पंपांचा वीजपुरवठा तात्काळ सुरू करावा, या रास्त मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डोंगराई चौकात आज सकाळी १०.३० वा. रास्ता रोको करून महावितरण आणि महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश घोलप हे देखील सामिल होणार आहेत.

निवडणुकीपूर्व शेतकऱ्यांना मोफत वीज द्या म्हणणारे सध्या सत्तेवर असूनही शेतकऱ्यांचा वीज पुरवठा चुकीच्या पद्धतीने  खंडित केला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या वीज तोडणी मोहिमेच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन होणार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना मदत करणे, आधार देणे हे राज्य शासनाचे कर्तव्य आहे. मात्र शेतकऱ्यांचे नाक-तोंड दाबून महाविकास आघाडी सरकार शेतीपंपांची वीज बिले नियमबाह्य पद्धतीने वसूल करत आहे.

या महाजनी वसुलीला राज्यमंत्र्यांची मूक संमती असून, इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी, महाविकास आघाडी सरकार आणि महावितरण यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळेच आज होणाऱ्या आंदोलनात इंदापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होतील असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आज होणाऱ्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार व शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी केले आहे.

फडणवीस सरकारने एकदाही वीज तोडली नाही - हर्षवर्धन पाटील - माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने ५ वर्षे सत्तेवर असताना शेतकऱ्यांची एकदाही वीज खंडित केली नाही. याउलट सध्याचे महाविकास आघाडी सरकार प्रतेक तीन ते चार महिन्याला अडचणीतील शेतकऱ्यांची नियमबाह्य पद्धतीने वीज बिलाची वसुली करीत आहे. शेतकऱ्यांवर होणारा हा अन्याय भाजप थांबवेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट