डोंगराई चौकात विचित्र अपघात; अचानक ब्रेक दाबल्याने आयशर टेम्पो आणि ट्रकच्या मध्ये सापडल्याने चारचाकीचा चुराडा; एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (२० मार्च) :- इंदापूर शहराच्या बायपास वरील डोंगराई चौकात शनिवारी रात्री ९ वा. ३० मिनिटांच्या आसपास भीषण अपघात झाला असून, या विचित्र व भीषण अपघातात संजीव दत्तात्रय कुलकर्णी हे जागीच ठार, तर त्यांच्या पत्नी सुखदा संजीव कुलकर्णी (५३ वर्ष) या गंभीर जखमी झाल्या आहेत. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
पुण्याच्या मोशी येथील रहिवाशी असलेले संजीव दत्तात्रय कुलकर्णी, सुखदा संजीव कुलकर्णी आणि त्यांची मुलगी असे तिघे जण आपल्या (MH 14 HW 6140) किया कंपनीच्या सेल्टॉस या खाजगी वाहनातून सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेले असताना डोंगराई चौकातील गती रोधक असलेल्या ठिकाणी हा अपघात झाला. वेगात असलेल्या आपल्या वाहनाचा कुलकर्णी यांनी अचानक दाबलेला ब्रेक आणि चुकीच्या पद्धतीने हायवेच्या डाव्या लेनवर उभा असलेला आयशर टेम्पो ही दोन अपघाताची कारणे असल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी म्हटले आहे. हा अपघात इतका भयानक होता की अपघातानंतर कुलकर्णी यांच्या वाहनाने पेट घेतला होता. सुदैवाने या अपघातात संजीव यांची मुलगी (वय अंदाजे २५ वर्ष) बचावली असून, तिला नागरिकांनी गाडीच्या दरवाज्यातून ओढून बाहेर काढले. या अपघातात गाडीचा अक्षरशः चेंदा झाला आहे. गॅस कटरच्या साहाय्याने गाडीचा वरचा पत्रा कापून जखमी असलेल्या सुखदा कुलकर्णी आणि मृत संजीव कुलकर्णी यांना बाहेर काढण्यात आले.
कसा झाला अपघात?
सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने जात असताना डोंगराई चौकातील गती रोधक असलेल्या ठिकाणी आले असता संजीव कुलकर्णी यांनी वेगात असलेल्या आपल्या गाडीचा अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रकने (KA 56 2459) काही कळण्याच्या आतच त्यांच्या गाडीला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे त्यांची गाडी हायवेवरील डाव्या लेनवर चुकीच्या पद्धतीने उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला जाऊन धडकली. आयशर टेम्पोला धडकल्याने त्यांची गाडी पुन्हा मागे आली. मागच्या ट्रकने पुन्हा एकदा कुलकर्णी यांच्या वाहनाला जोरदार टक्कर देत दूरपर्यंत फरपटत नेहले. हे सर्व अगदी क्षणार्धात घडल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी म्हटले. यामुळे कुलकर्णी यांच्या वाहनाने लागलीच पेट घेतला. जवळच असलेल्या डोंगराई हॉटेलच्या मालक व कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या साहाय्याने आग विझवत कुलकर्णी यांच्या मुलीला बाहेर काढले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा