विकास कामांसाठी निधी कसा आणायचा याची हातोटी भरणे यांच्याकडे; रविवारी होणार काटी, रेडा, रेडणी भागात २० कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (२६ मार्च) :- विकास निधी कसा आणायचा याची हातोटी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे असल्याचे राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी १८ मार्च रोजी गोखळी येथील जाहीर सभेत म्हटले होते. याची अनुभवात्मक प्रचिती आता इंदापूरकरांना येऊ लागली आहे. भरणे यांच्या विकास कामांच्या भूमीपूजनाचा आणि उद्घाटनाचा सपाटा लगातार सुरूच असून, येत्या रविवारी देखील काटी, रेडा, रेडणी, गिरवी, वरकुटे अशा विविध भागात २० कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडणार आहे.
१९ मार्च रोजी गोखळी येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी, निधीच्या संबंधित राज्यमंत्र्यांची प्रशंसा करताना, निधी कसा आणायचा, कुठून आणायचा, यासाठी कोणाला भेटायचे याची हातोटी दत्तात्रय भरणे यांना बखुबी असल्याचे म्हटले होते. याचाच अनुभव इंदापूरकरांना येत आहे. मंत्रिपदाच्या अवघ्या दोन वर्षांच्या कार्यकाळात दत्तात्रय भरणे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक निधी इंदापूर तालुक्यासाठी आणण्याची किमया साधली आहे. केवळ मार्च महिन्यात भरणेंनी तालुक्यातील वडापूरी पंचायत समिती गणातील अनेक गावे, कुंभारगाव, गोखळी आणि तावशी अशा विविध ठिकाणी आतापर्यंत जवळपास ४० कोटींच्या आसपास भूमिपूजने आणि उद्घाटने केली आहेत.
उद्या (२७ मार्च) काटी-रेडा रस्ता ३ कोटी रुपये, काटी-निरा-भीमा कारखाना रस्ता ६.११ कोटी रुपये, काटी ओढ्यावरील पुल व इतर कामे १ कोटी रुपये, गिरवी येथील ५ कोटी ६२ लाख रुपयांच्या विकास कामांसह २० कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रम प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडणार आहे. दुपारी १ वा. गिरवी येथे, तर सायंकाळी ७ वा. काटी येथे जाहीर सभा होणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा