ट्रॉलीतील ऊस अंगावर पडल्याने एकाचा जागीच मृत्यू; इंदापूर तालुक्यातील धोकादायक ऊस वाहतूकीकडे प्रशासनाचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष
समीर सय्यद (उपसंपादक)
इंदापूर (२९ मार्च) :- धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतील ऊस अंगावर पडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना इंदापूर तालुक्यातील निरा भीमा कारखान्यानजीक ६ मार्च रोजी सायंकाळी ७ वा.३० मिनिटांच्या सुमारास घडली होती. या घटनेत नारायण रामचंद्र जाधव (रा. बोराटवाडी, ता. इंदापूर) यांचा जागीच मृत्यु झाला होता. या संदर्भात संजय मधुकर फडतरे (वय २६ वर्ष, रा. बोराटवाडी, ता. इंदापूर) यांच्या फिर्यादीवरून रविवारी (२६ मार्च) सतिश सिताराम बोडके (रा. पिंपरी बु. ता. इंदापूर) या ट्रॅक्टर चालकाविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर शहरासह संपूर्ण तालुक्यातून धोकादायक व नियमबाह्य पद्धतीने होणाऱ्या ऊस वाहतुकीकडे संबंधित प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष अशा घटनांसाठी कारणीभूत ठरत आहे.
या अपघातातील मयत आणि फिर्यादी दोघेही ट्रॅक्टर चालक असल्याने ऊसाने भरलेले ट्रॅक्टर निरा भीमा साखर कारखान्याच्या यार्डमध्ये सोडून नेहमीप्रमाणे एकाच दुचाकीवर (एम एच ४२ व्हि १५२७) रेडा मार्गे आपल्या घरी निघाले होते. यावेळी ओव्हरलोड ऊस भरलेल्या दोन ट्रॉल्या घेऊन भरधाव वेगात कारखान्याकडे निघालेल्या ट्रॅक्टरच्या (एमएच १० एवाय १०८४) दुसऱ्या ट्रॉलीच्या उजव्या बाजूकडील टायर अक्सलमधून निघाल्याने ट्रॅक्टरचे संतुलन बिघडले. त्यामुळे ट्रॅक्टर पिळला जाऊन ट्रॉलीतील ऊसाच्या मोळ्या दुचाकी चालवत असलेल्या नारायण जाधव यांच्या अंगावर पडल्याने त्यांच्या डोक्याला, मानेला, छाती व पाठीला गंभीर इजा झाली होती. तर दुचाकीच्या मागे बसलेले संजय फडतरे हे किरकोळ जखमी झाले होते. लोकांनी जाधव यांच्या अंगावर पडलेल्या ऊसाच्या मोळ्या काढून उपचारार्थ अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.
अनेक सहकारी व खाजगी साखर कारखाने असलेल्या इंदापूर तालुक्यात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून धोकादायक पद्धतीने होणाऱ्या ऊस वाहतूकीचा प्रश्न फार गंभीर आहे. २० फेब्रुवारीच्या मध्यरात्री देखील इंदापूर शहरातील दूरसंचार निगम कार्यालयासमोर ऊसाने भरलेल्या ट्रॉलीचा टायर फुटून ट्रॉली एका चारचाकीवर उलटल्याने चारचाकीचा अक्षरशः चुराडा झाला होता. इंदापूर शहरातील पुणे सोलापूर महामार्गावर अनेक शासकीय कार्यालये, शाळा, कॉलेज रुग्णालये असल्याने महामार्गावर विद्यार्थी, नागरिक व दुचाकींची बेमाप गर्दी असते. पादचारी मार्गही नगरपरिषदेने भाड्याने दिल्याने अवजड वाहने आणि बेकायदेशीरपणे दोन ट्रॉल्यामध्ये ओव्हरलोड ऊस भरून वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रकांदरम्यान विद्यार्थ्यांना, नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन वाट शोधावी लागत आहे. मात्र सुस्त व भ्रष्ट प्रशासन, यावर कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाही. भवानीनगर येथील छत्रपती साखर कारखान्याबाहेरची वाहतुकीची कोंडी व एकूणच परिस्थिती न सांगितलेलीच बरी.
मोठमोठ्याने गाणी वाजवत ओव्हरलोड ऊस भरून कारखान्यांकडे चाललेल्या ट्रॅक्टरमधून, बजाटमधून अनेकवेळा ऊसाच्या अनेक मोळ्या रस्त्यावर पडतात. ऊस वाहतूक करताना बिघाड, पंक्चर झालेले अनेक ट्रॅक्टर, ट्रक, रस्त्यावरच उभे केले जातात. अनेक वाहनांच्या मागे रिफ्लेक्टरही नसतात. या आणि अशा अनेक कारणांनी होणारे अपघात, जाणारे जीव याला संबंधित प्रशासनाची जाणीवपूर्वक डोळेझाक कारणीभूत असून, सुस्त व भ्रष्ट प्रशासनाची डोळेझाक अजून किती जणांचा बळी घेणार असा सवाल उपस्थित होत आहे.
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा