स्वाभिमानी शिक्षक परिवाराचे कार्य कौतुकास्पद - मधुकर (मामा) भरणे


सात वर्षे आमदार आणि दोन वर्षे मंत्री असूनही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा फोटो शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात नाही - अमोल (शेठ) भिसे

समीर सय्यद (उप संपादक)

इंदापूर (६ मार्च) - स्वाभिमानी शिक्षक परिवाराचे कार्य कौतुकास्पद असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वाभिमानी शिक्षक परिवारातील पदाधिकारी घेत असलेली मेहनत उल्लेखनीय असल्याचे मत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मधुकर भरणे यांनी व्यक्त केले. स्वाभिमानी शिक्षक परिवाराच्या वतीने शैक्षणिक आणि शिक्षक संघटना क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षक बांधवांचा व शिक्षक भारती संघटनेच्या नुतन तालुका कार्यकारणी आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी इंदापूर येथील आय.एम.ई.आय. हॉलमध्ये शनिवारी (५ मार्च) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मधुकर भरणे व माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल (शेठ) भिसे यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

स्वाभिमानी शिक्षक परिवारामध्ये वेगवेगळ्या शिक्षक संघटना अंतर्भूत असून, स्वाभिमानी परिवाराचा हिस्सा असलेल्या शिक्षकांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीशी निगडित अनेक समस्या स्वाभिमानी शिक्षक परिवाराच्या माध्यमातून सोडविण्यात आल्या आहेत. या स्वाभिमानी परिवाराने भूतकाळात केवळ शिक्षकांसाठीच नव्हे तर विद्यार्थ्यांसाठी देखील अनेक प्रेरणादायी उपक्रम राबविले असल्याचा विशेष उल्लेख करत मधुकर भरणे यांनी, एकूणच स्वाभिमानी शिक्षक परिवाराचे कार्य कौतुकास्पद आणि या संघटनेचे पदाधिकारी शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी घेत असलेली मेहनत उल्लेखनीय असल्याचे मत व्यक्त केले. सोबतच त्यांनी कोरोना काळात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी केलेल्या कामाचेही विशेष कौतुक केले.


शनिवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सत्कारमुर्तींमध्ये, बबन सुरवसे, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त - इशरत मोमीन, संदिप येवले, सतीश भोंग, जयश्री सरके आणि सुप्रिया आगवणे, त्याचप्रमाणे, शिक्षक भारती कार्यकारणी सतीश शिंदे (तालुकाध्यक्ष) बाळासाहेब चव्हाण (मा. तालुकाध्यक्ष), सतीश राऊत (उपाध्यक्ष) सचिन गुरव (सरचिटणीस) संदिप नवले (कोषाध्यक्ष), संतोष ननवरे (प्रसिद्धी प्रमुख), संतोष चोरमले (संघटक), अनिलकुमार सवाणे (सल्लागार), राजकुमार तरंगे (सोशल मिडिया प्रमुख), तुकाराम भोसले (जिल्हा प्रतिनिधी), सहदेव काळेल (जिल्हा प्रतिनिधी), रामचंद्र शिंदे, विनोद नरूटे, चंद्रकांत वाघमारे, तानाजी नरळे, अशोक नरूटे, अण्णा पवार, सुभाष चव्हाण, दत्तात्रय जाधव, अनिल रासकर, जावेद मुलाणी, सतीश बाबर, भाऊसाहेब ढवळे, विलास मारकड (इतर पदाधिकारी) इ. चा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानासाहेब नरूटे, सुत्रसंचालन सचिन देवडे यांनी तर आभार संतोष गदादे यांनी मानले.

अमोल भिसे (माजी जिल्हा परिषद सदस्य) - इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी व विविध खात्यांचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे मागील सात वर्षांपासून इंदापूर तालुक्याचे आमदार व मागील दोन वर्षांपासून मंत्री असूनदेखील इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेत त्यांचा साधा फोटो देखील लावण्यात आला नाही. मागील  सात वर्षांत   पतसंस्थेत झालेल्या एकाही वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांना बोलावण्यात आले नाही. शिक्षक पतसंस्थेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची ही दुटप्पी आणि शिक्षकांना न शोभणारी भूमिका शिक्षकांच्या हिताची कदापी असू शकत नाही. त्यामुळे यावेळी शिक्षक पतसंस्थेत परिवर्तन घडवून आणा.

किशोर वाघ (राज्य समन्वयक, इब्टा संघटना) - स्वाभिमानी शिक्षक परिवाराचे कार्य कौतुकास्पद असून, आगामी काळातही स्वाभिमानी शिक्षक परिवारातील चारही शिक्षक संघटना एकत्रितपणे शिक्षकांचे प्रश्न सोडवतील यात दुमत नाही. ऑनलाइन व्हिडीओ निर्मितीत महिला शिक्षिकांनी केलेल्या कार्यामुळे शिक्षण विभागाची मान नक्कीच उंचावली आहे.

सतीश शिंदे (तालुकाध्यक्ष शिक्षक भरती) - स्वाभिमानी शिक्षक परिवार ही संघटना शिक्षकांच्या समस्या तळमळीने सोडविणारी संघटना असून, वस्तीशाळा शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक भारती ही संघटना आगामी काळातही स्वाभिमानी शिक्षक परिवारासोबतच राहणार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट