अरे चोरांनो ! शाळांना तरी सोडा, इथे देशाचे भविष्य घडवले जाते; जिल्हा परिषदेच्या शाळांवरही आता चोरट्यांच्या वाईट नजरा


मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (७ फेब्रुवारी) :- इंदापूर तालुक्यातील रेडा गावात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्यावर चोरट्यांनी हात साफ केला असून, शिक्षणाचा बाजार मांडला जात असताना, देशातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा एकमेव आधार असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतच चोरट्यांनी संगणक आणि टीव्हीवर हात साफ केल्याने, अरे चोरांनो ! शाळांना तरी सोडा, 'इथे देशाचे भविष्य घडवले जाते' अशी विनंती चोरट्यांना करण्याची वेळ आली आहे. ही घटना ७ जानेवारी सायंकाळी ५ वा. ते ८ जानेवारी सकाळी ६ वा. दरम्यान घडली असून, शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता नायकु जाधव (सध्या रा. रेडा, ता. इंदापूर) यांनी शनिवारी (५ फेब्रुवारी) याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या घटनेमध्ये रेडा ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी शाळेला भेट दिलेला २५ हजार रुपये किंमतीचा एक ५० इंची एलइडी टीव्ही आणि शासनाकडून मिळालेला १० हजार रुपये किंमतीचा एक संगणक संच असा एकूण ३५ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. ८ जानेवारीच्या सकाळी विद्यार्थ्यांसाठी जेवण बनविणाऱ्या सारिका मोहिते यांनी शाळेत आल्यानंतर साहित्य ठेवलेल्या खोलीचे कुलूप तुटल्याचे व सर्व सामान अस्तव्यस्त पडल्याचे पाहून मुख्याध्यापिकेला फोनद्वारे याची कल्पना दिली होती. शासन आणि ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार करून चोरी झालेल्या साहित्याशी संबंधित पावत्या मिळाल्यानंतर मुख्याध्यापिका संगीता जाधव यांनी शनिवारी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हे देखील वाचा :- पालखी मार्गावरील कामा दरम्यान क्रेनच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे विद्युत शॉक लागल्याने एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू

खाजगी व महागड्या शिक्षण संस्थांच्या गर्दीत जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था बिकट झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा महावितरणच्या निर्णयामुळे अंधाराच्या कचाट्यात सापडल्या होत्या. त्यामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना ई-लर्निंग, ई-कॉमर्स आणि संगणकाच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. शासन प्रशासनाच्या नजरे करम'पासून दूर असलेल्या शाळांवरही आता चोरट्यांच्या वाईट नजरा पडू लागल्याने गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं कसं असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट