घोडे बाजार इंदापूरात चर्चा मात्र देशभरात; जाणून घ्या पुणे जिल्ह्यातील एकमेव घोडे बाजाराची ठळक वैशष्ट्ये
समीर सय्यद (मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क)
इंदापूरमध्ये ४ जानेवारी पासून सुरू झालेला घोडे बाजार देशभरातील घोडे शौकिनांसाठी चांगलीच मेजवानी ठरत असल्याने, घोडे बाजार इंदापूरात चर्चा मात्र देशभरात अशी चर्चा सध्या रंगत आहे. या घोडे बाजाराच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इंदापूरचे नांव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असून, २०१८ साली सुरू झालेल्या या घोडे बाजाराचे हे सलग पाचवे वर्ष आहे. मारवाड, पंजाब आणि अरबी जातीच्या घोड्यांसह अनेक वेगवगळ्या जातीचे व गुणांचे घोडे विक्रीसाठी सलग पाचव्या वर्षी इंदापूरमध्ये दाखल झाले आहेत. पुणे जिल्ह्यात भरणारा हा एकमेव घोडेबाजार असून, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून होणारा हा घोडेबाजार फेब्रुवारी अखेर पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव वैभव दोषी यांनी दिली आहे.
हौसेला मोल नसते असे नेहमीच म्हटले जाते. स्वतः उत्तम घोडेस्वार व घोड्यांचे शौकीन असलेले इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व पिडीसिसी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व उप सभापती यशवंत माने यांच्या प्रयत्नांमुळे मागील पाच वर्षांपासून इंदापूरमध्ये होत असलेल्या या घोडे बाजारामध्ये घोडे शौकिनांची होत असलेली गर्दी पाहून तंत्रज्ञानाच्या युगातही देखणा, तगडा आणि ऐटबाज घोडा आपल्याकडेही असावा असे वाटणाऱ्यांची संख्या आजही कमी नाही असेच म्हणावे लागेल. बाजार समिती या अभिनव उपक्रमाबरोबरच दरवर्षी घोड्यांच्या विविध स्पर्धा, कृषी प्रदर्शन, डॉग शो, जनावरांचे प्रदर्शन, महिलांसाठी होम मिनिस्टर, शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करत असते.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सलग पाच वर्षांपासून होत असलेल्या या घोडेबाजाराच्या माध्यमातून सबंध देशात इंदापूरचे नांव पोहोचवणे हा एकमेव उद्देश या पाठीमागे असून, या बाजाराचा आर्थिक फायदा व्यवसायाच्या माध्यमातून परिसरातील व्यापारी आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. भविष्यात इंदापूरचे नावलौकीक देशभरात कसे पोहोचेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - आप्पासाहेब जगदाळे (माजी सभापती - कृषी उत्पन्न बाजार समिती, इंदापूर)
सबंध पुणे जिल्ह्यात घोडे बाजार ही संकल्पना राबविणारी एकमेव बाजार समिती म्हणून इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रसिद्ध आहे. न भूतो न भविष्यती असा हा अभिनव उपक्रम इंदापूरच्या नावलौकिकात भर घालत असून, घोडे शौकिनांसाठी मेजवानी ठरत असलेल्या या घोडे बाजारामुळे हजारो लोकांना, शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना रोजगार मिळाला आहे. यापुढेही असे अभिनव उपक्रम राबवून इंदापूरचे नाव देश पातळीवर पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. - दत्तात्रय (आबा) फडतरे (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, इंदापूर)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा