ती उसाने भरलेली ट्रॉली विद्यार्थ्यांच्या अंगावर पडली असती तर? इंदापूर शहरातून धोकादायक पद्धतीने होणाऱ्या ऊस वाहतुकीवर प्रश्नचिन्ह.
समीर सय्यद (उप संपादक)
इंदापूर (२१ फेब्रुवारी) :- ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची उसाने भरलेली ट्रॉली एका चारचाकीवर उलटल्याने चारचाकीचा चुराडा झाला. सुदैव गाडीत कोणी नव्हतं. अंदाजे १०-१५ टन उसाने भरलेली ही ट्रॉली नागरिक अथवा विद्यार्थ्यांच्या अंगावर पडली नाही हे नशीबच. मात्र पडली असती तर? हा विचार न केलेलाच बरा. रविवारच्या (२० फेब्रुवारी) मध्यरात्री दूरसंचार निगम (टेलिफोन एक्सचेंज) कार्यालयासमोर घडलेल्या या घटनेनंतर इंदापूर शहरातून प्रशासनाच्या दुर्लक्ष आणि कारवाई अभावी वाहतुकीच्या नियमांची बँड वाजवत नियमबाह्य व धोकादायक पद्धतीने सुरू असलेली ऊस वाहतूक शहराबाहेरून वळवणे गरजेचे असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. नियमबाह्य पद्धतीने क्षमतेपेक्षा जास्त व धोकादायक पद्धतीने ऊस वाहतुक होत असतानाही प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यामागचे नमके कारण काय असा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागला आहे.
इंदापूर शहरातून जाणाऱ्या पुणे सोलापूर हायवेवरील टेलिफोन एक्सचेंजपासून संविधान चौकापर्यंतच्या भागात अनेक शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, न्यायालय, खाजगी व शासकीय दवाखाने, बसस्थानक, व्यापारी गाळे आणि आठवडे बाजार भरत असल्याने या परिसरात नागरिकांची, विद्यार्थ्यांची व वाहनांची नेहमी वर्दळ असते. सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असल्याने कारखान्यांसाठी इंदापूर शहराच्या उत्तर पूर्व पट्ट्याच्या उजनी पाणलोट क्षेत्रातील पडस्थळ, चिंधादेवी, शिरसोडी, माळवाडी नं १, शहा, हिंगणगाव, कांदलगाव या गावांसह करमाळा व माढा या तालुक्यांमधून ऊस वाहतूक करणारे हजारो ट्रॅक्टर दिवस-रात्र शहरातून येरझऱ्या मारत आहेत. प्रशासनाचा वरदहस्त म्हणा अथवा दुर्लक्ष परंतु कारवाई अभावी हे ट्रॅक्टर चालक वाहतुकीच्या नियमांना पायदळी तुडवत धोकादायक पद्धतीने शहरातून निडरपणे ऊस वाहतूक करत आहेत. ट्रॉली चारचाकीवर उलटल्याने जिवितहानी झाली नसली तरी विषय गंभीर नक्कीच आहे. त्यामुळे शक्य असेल ती वाहतूक बायपासने वळवणे गरजेचे आहे. तर पडस्थळ, चिंधादेवी, शिरसोडी या भागातील ऊस वाहतुकीला पर्यायी मार्ग देणे अथवा रात्री १० नंतर वाहतुकीचा नियम लावणे गरजेचे आहे. शिवाय नियम मोडून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक व मालकांवर कारवाई होणेही आवश्यक आहे.
११ ऑक्टोबर २०२० रोजी बाबा चौकात ट्रकच्या धडकेत अडीच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मात्र अद्यापही शहरातून होणाऱ्या अवजड वाहनांच्या प्रवेश बंदीचे अथवा धोकादायक पद्धतीने होणाऱ्या ऊस वाहतुकीचे प्रयोजन प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची वर्दळही आता वाढलेली आहे. भरधाव वेगात जाणारी अवजड वाहने आणि धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक यामुळे विद्यार्थ्यांच्याही जिवाला धोका निर्माण झाला आहे. याआधी अपघातात विद्यार्थ्यांचा जीव गेल्याची पार्श्वभूमी देखील आहे. त्यामुळे ऊस वाहतूक शहराबाहेरून वळवण्याबरोबरच संविधान चौक, बाबा चौक, बस स्थानक, ना. रा. हायस्कूल, आय कॉलेज अशा वेगवगळ्या ठिकाणी गतिरोधक बसविणे देखील आवश्यक आहे. शाळा प्रशासनाने देखील ही मागणी संबंधित खात्याकडे करणे गरजेचे आहे. आज जिवितहानी झाली नसली तरी, उद्या होणार नाही याची खात्री कोण देणार? जबाबदारी कोण घेणार? या गंभीर विषयाविरोधात कोणीच 'ब्र' शब्द काढायला तयार नाही. या विषयाकडे गांभिरने बघण्यासाठी प्रशासनाला आणखी किती बळींची गरज आहे असा सवाल इंदापूरकरांना पडत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा