ग्रामदैवत इंद्रेश्वराची ग्रामयात्रा व रथोत्सव कार्यक्रमाला आजपासून सुरुवात; मंदिराशी निगडित खालील वैशिष्ठे इंदापूरकरांना माहीतच हवीत
समीर सय्यद (उप संपादक)
ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या इंदापूर शहरातील प्राचीन मंदिर आणि ग्रामदैवत श्री इंद्रेश्वर महादेवाची ग्रामयात्रा व भव्य रथोत्सव सोहळ्याला आजपासून (२६ फेब्रुवारी) सुरुवात झाली असून, हा सोहळा २ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने पुढील चार दिवसांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे इंद्रेश्वर मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र वाशिंबेकर यांनी म्हटले आहे. यामधे पुजन, भजन, बालवर्ग, रथोत्सव, सवाद्य मिरवणूक, नगरभ्रमण, आरती व प्रसाद, किर्तन, महाप्रसाद, असे वेगवगळे कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. २०१७-१८ साली लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोध्दार केल्यानंतर महादेवाची ग्रामयात्रा व रथोत्सव आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली होती.
ग्रामयात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे रथोत्सव तथा नगरभ्रमण. महादेवाची पंचमुखी चांदीची मूर्ती आणि संपूर्ण फुलांनी सजवलेल्या आकर्षक लाकडी रथासह हजारो नागरिक संपूर्ण शहरातून भ्रमंती करतात. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी निघणाऱ्या या रथयात्रेत हिंदू मुस्लिम आणि एकूणच सर्व जाती धर्मातील हजारो ग्रामस्थ, युवक, युवती, महिला मोठ्या संख्येने सहभागी होतात. या लाकडी रथाला जाड दोर खंडाने ओढण्यासाठी ग्रामस्थ, युवक यांच्यात ओढ लगलेली असते. विशेष म्हणजे महिलाही मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. यावेळी रथापुढे पारंपारिक झेंड्यासह हलग्या, संबळ वादन याबरोबरच पुरुष दानपट्टा तर महिला फुगडी, टिपऱ्या सारखे पारंपारिक खेळ खेळतात. रथयात्रेनंतर ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीही ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजकांकडून आयोजन करण्यात येते. एकूणच या सोहळ्याला सणासारखे स्वरूप आलेले असते.
१९५२ मध्ये ग्रामस्थांनी श्री इंद्रेश्वर देवस्थान ट्रस्टची स्थापना केली. त्यावेळी शंकर लक्ष्मण वाशिंबेकर यांची या ट्रस्टचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आजही वाशिंबेकर कुटुंबीय मंदिराची सर्व व्यवस्था पार पाडतात. मालोजीराजेंच्या गढीच्या पूर्वेला व मंदिराच्या बाजूला एक इंद्रायणी नदी होती जी आता पाणदरा म्हणून ओळखली जाते. २०१८ मध्ये, स्वामी श्री महामंडलेश्वर गीता भारती (माताजी) यांच्या हस्ते मंदिरात पूजन करण्यात आले. तेव्हापासून श्रावण महिन्यात रोज रुद्र अभिषेक केला जातो. याव्यतिरिक्त, मंदिर भाविकांसाठी वर्षभर खुले असते आणि या ठिकाणी दररोज आरती केली जाते. शहरातील सर्व समाजातील लोक मंदिराची स्वच्छता राखण्यासाठी हातभार लावतात. मुस्लिम समाजही यामध्ये सहभागी असतो.
मंदिरात एक प्राचीन दगडी विहीरही आहे. जी मंदिराच्या जीर्णोद्धार प्रसंगी स्लॅब टाकून झाकण्यात आली आहे. मंदिराची स्वच्छ्ता अथवा आवश्यक त्या कामांसाठी याच विहिरीचे पाणी वापरण्यात येते. आजही दगडी विहिरीला वर्षभर स्वच्छ पाणी असते. १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळातही या विहिरीला तुडुंब पाणी होते. या दुष्काळातही संपूर्ण गावाची तहान या विहिरीने भागवल्याचे जुने जाणते नागरिक सांगतात. या मंदिराचा पूर्व दरवाजा परांडा प्रवेशद्वार (वेस) म्हणून ओळखला जात असे, तर पश्चिम दरवाजा राम दरवाजा (वेस) म्हणून ओळखला जात असे. उत्तर आणि दक्षिण दिशेने आणखी दोन प्रवेशद्वार होते. आता केवळ रामवेसचे अवशेष बाकी आहेत. पाणदरा हा पाण्याचा भाग असल्याने ऐन पावसाळ्यात हे मंदिर पाण्यात बुडून जायचे. कालांतराने हे प्राचीन मंदिर आपले सार गमावू लागल्याने, विशेषतः मंदिराच्या गाभाऱ्यात अनेक महिने संपूर्ण पाणी भरत असल्याने देव दर्शनासाठी लोकांना अडचणी येत असल्याची बाब लक्षात घेऊन ट्रस्टच्या सध्याच्या विश्वस्तांनी, सदस्यांनी लोक वर्गणीतून मंदिराची पुनर्बांधणी करून २०१७-२०१८ साली संपूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. या मंदिराच्या पश्चिमेकडे चांदशाह वलींची दर्गा, उत्तरेकडे प्राचीन आलमगीर (काली) मस्जिद, दक्षिणेकडे प्राचीन जुमा मस्जिद, पूर्वेकडे सिध्देश्वर मंदिर हे इंदापूर शहरातील वैचारिक एकतेचे, सामाजिक बंधुभावाचे आणि सांस्कृतिक एकोप्याचे उत्तम उदाहरण आहे.
१९९५ साली इतिहास तज्ञ बाबासाहेब पुरंदरे यांनी इंदापूरला भेट देऊन स्थानिक भाविकांच्या मदतीने मालोजीराजे भोसले पादुकांचे महाशिवरात्रीला रुद्र अभिषेक करून, भजन व कीर्तनासह मंदिरावर कागदी ध्वजारोहण केले. संपूर्ण शहरातील स्थानिक पुरणपोळीसारखे पदार्थ बनवून हा सण साजरा करतात. संपूर्ण महाराष्ट्रातून बरेच लोक इंद्रेश्वर मंदिराला भेट देतात आणि हे प्रसिद्ध मंदिर पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. मंदिर ट्रस्ट आणि सदस्यांनी इंदापूर शहर व तालुक्यातील सर्व मंदिर, सर्व मस्जिद, सर्व चर्चच्या विश्वस्तांना आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
नोट:- मंदिराच्या ऐतिहासिक बाबींची माहिती http://www.gramdaivatindreshwartemple.org/ या वेबसाइटवरून घेण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा