आज परत एकदा सूर्य उगवलाय... नामदेव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त लेखिका स्वाती चव्हाण यांनी नामदेव ढसाळ यांना समर्पित केलेली कविता


मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९, पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते आहेत. महानगरीय जीवन आणि बोली भाषा या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखन त्यांनी केले आहे.दलितांचे,शोषितांचे जीवन स्वतः भोगलेला, अनुभवलेला हा सिद्धहस्त लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार आहे. त्यांनी दलित पँथर ही सशस्त्र संघटना १९७२ मध्ये सुरू केली.१९७३ मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह गोलपीठा प्रकाशित झाला. यानंतर आणखी कवितासंग्रह मूर्ख म्हातार्‍याने डोंगर हलवले, तुझी इयत्ता कंची?, खेळ, आणि प्रियदर्शीनी प्रसिद्ध झाले. आपल्या विशिष्ट शैलीने मराठी कवितेच्या परंपरेत मोलाची भर घालणार्‍या आणि भाषिक दृष्टया प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा वापरून मराठीला समृद्ध करणार्‍या मोजक्या साहित्यिकांपैकी एक प्रतिभाशाली कवी.

नामदेव ढसाळांच्या कविता ह्या सत्य परिस्थितीवर कडक  जहाल असे ताशेरे ओढणाऱ्या आहेत,  ढसाळांची लेखणी वरण भातावर पसरवलेल्या साजूक तुपासारखी नसून गोफणगुंडय़ातून सणसणत सुटणारे गोट्यांसाट्यांसारखी आहे. ती एका चळवळीची,भाकरीची, ऊन- चिकट रक्ताचे पाट पाहणार्‍या, सल्ली-डल्ली-बोटी वाल्यांची, अत्तदीपभवाच्या दिशेने नेणारी, कोणत्याही प्रकारची सेटलमेंट नाकारणारी कविता आहे. शेठ-सावकारांविरोधात उच्चारलेला जहाल यल्गार आहे. साठीच्या दशकातला एक असा कवी ज्याने मराठी साहित्यातील कवितेला नवे परिमाण मिळवून दिले. आंबेडकरी चळवळीतील एक महत्वाचे साहित्यिक, विद्रोही कवी व पँथर नेते नामदेव ढसाळ यांच्या जयंतनिमित्त स्वाती चव्हाण यांनी नामदेव ढसाळ यांना अर्पण केलेली ही कविता.....

आज परत एकदा सूर्य उगवलाय.....

प्रस्थापितांच्या कानात विद्रोहाचं शिसं ओतायला

मूकनायकाचा आवाज होऊन न्यायाची आरोळी ठोकायला

आज परत एकदा सूर्य उगवलाय.....

चळवळीच्या वाटेतली बांडगुळं ठेचायला

आज परत एकदा सूर्य उगवलाय.....

अंधाऱ्या रातीचं डोळं होऊन प्रकाशमान व्हायला

भीम सूर्याचं तेज होऊन साऱ्या जगाला दाखवायला

आज परत एकदा सूर्य उगवलाय.....

नुसताच गलका नाही नुसताच कल्ला नाही

तर ज्ञान अभ्यासाच्या तराजूत तोलून, मापून, सलाखून

आपल्यातले परके अन परक्यातले आपले ओळखत

साळसुदपणाचे बुरखे टराटरा फाडून टाकायला

आज परत एकदा सूर्य उगवलाय.....

प्रस्थापितांनो ! तयारीत राहा.

तुमच्या बुडाला आग लावायला आमचा पँथर आलाय.

(लेखिका - स्वाती चव्हाण)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट