महिलांनो ! एसटीने इंदापूर-पुणे, इंदापूर-अकलूज प्रवास करताय? असाल तर आपले दागिने सांभाळा.

इंदापूर-पुणे, इंदापूर-अकलूज एसटीने प्रवासादरम्यान चोरीच्या दोन घटना; एकूण ७ लाख १५ हजारांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

चेतन चव्हाण (संपादक)

इंदापूर (२७ फेब्रुवारी) :- २३ आणि २४ फेब्रुवारी या दोन दिवसांत झालेल्या चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पुणे-इंदापूर आणि इंदापूर-अकलूज दरम्यान एसटीने प्रवास करणाऱ्या दोघा महिला प्रवाशांचे तब्बल ७ लाख १५ हजार रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने, महिलांनो ! एसटीतून प्रवास करताय? मग आपले दागिने सांभाळा असे म्हणण्याची वेळ आली आहे. २३ तारखेला दुपारी इंदापूर-अकलूज असा प्रवास करणाऱ्या ५५ वर्षीय शामा चंद्रकांत कुंभार (रा. यशवंतनगर अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी रुमालात बांधून आपल्या पर्समध्ये ठेवलेले तब्बल २ लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने इंदापूर अकलूज दरम्यान अज्ञात चोरट्याने लंपास केले. तर २४ तारखेच्या इंदापूर येथील आपल्या भाच्याच्या बारशासाठी स्वारगेट-इंदापूर असा दुपारी एसटीने (एम-एच-२०-बीएल-४१४७) प्रवास करणाऱ्या नेहा नितीन पवार (रा. स्वारगेट, बिबेवाडी, पुणे) या ३६ वर्षीय महिलेचे बॅगेत ठेवलेले तब्बल ४ लाख ७० हजार ४०० रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत.

याबाबत नेहा पवार यांनी १ वा. १५ मिनिटांच्या आसपास यवत (ता. दौंड) येथून एसटीमध्ये चढलेल्या व हॉटेल साईसागर दरम्यान उतरलेल्या एका अनोळखी महिलेवर संशय व्यक्त केला आहे. या दोन्ही घटनांबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम ३७९ नुसार अज्ञात व्यक्तींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटना पाहता इंदापूर पुणे अथवा इंदापूर अकलूज दरम्यान एसटीने प्रवास करताना प्रवाशांनी विशेषतः महिलांनी आपल्या दागिन्यांबाबत विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट