फिरोजखान पठाण... सामाजिक कार्याच्या माध्यमातून उभरतं युवा नेतृत्व

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१८ फेब्रुवारी) :- सामाजिक कार्याच्या माध्यमातून इंदापूर शहरातील एक उभरतं युवा नेतृत्व म्हणजे टिपू सुलतान यंग सर्कल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष फिरोजखान लियाकत पठाण. ह्या संवेदनशील आणि सामाजिक भान असणाऱ्या कृतिशील युवा नेतृत्वाचा गुरुवारी (१७ फेब्रुवारी) ३० वा वाढदिवस साजरा झाला. आजच्या कलयुगात समाज उद्घाराच्या साऱ्या संकल्पना प्रसिद्धीच्या बाजारात मातीमोल ठरत असताना, लोकं स्वहित साधून मोकळे होत असताना काही माणसं वर्तमानाशी दोन हात करत समाजासाठी पुढे येतात. प्रसिद्धी पासून दूर राहतात. तत्वनिष्ठा महत्वाची मानून पुढे चालतात. अशांपैकीच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे फिरोजखान पठाण. आजोबा रशिदखान पठाण स्वातंत्र्यसैनिक, तर वडील लियाकत पठाण हे माजी नगरसेवक. त्यामुळे साहजिकच फिरोज पठाण यांना परंपरागत देशसेवेचा आणि समाजोपयोगी कामाचा वारसा मिळाला. 

समाजोपयोगी कामे करता यावी या उद्देशाने २००८ साली स्थापन केलेल्या टिपू सुलतान यंग सर्कल या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून फिरोजखान पठाण यांनी अनेक समाजोपयोगी कामांना मूर्त स्वरूप दिले. यामध्ये प्रामुख्याने महापुरुषांची जयंती साजरी करण्याबरोबरच २०१६ साली लोकवर्गणीतून घेतलेल्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून कोरोना काळात हजारो रुग्णांची ना नफा ना तोटा तत्वावर केलेल्या सेवेचा प्रामुख्याने समावेश करता येईल. आज परवडेल एवढ्या माफक दरात गोरगरिबांना रुग्णवाहिका उपलब्ध झाली ती यांच्यामुळेच. अनेक अपघातग्रस्तांना उपचारासाठी आपल्या रुग्णवाहिकेतून त्यांनी स्वतः रुग्णालयात पोहोचवून त्यांचे प्राण वाचवले आहेत. 

टिपू सुलतान यंग सर्कल ग्रुपच्या माध्यमातून टिपू सुलतान जयंती साजरी करत असताना त्यांनी फक्त आपल्याच नव्हे, तर सर्व जाती-धर्माचे झेंडे व सर्व महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे फोटो (प्रतिमा) आणि दारूबंदी, स्त्रिभ्रूण हत्या, हुंडा बळी, बेटी बचाओ बेटी पढाओ अशा विविध सामाजिक विषयांवर फलके लावून शहरातून भव्य रथयात्रा काढत सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय पवित्र रमजान महिन्यात इफ्तार पार्टी, गोरगरिबांना लग्नकार्यासाठी, शिक्षणासाठी आणि गरजवंत रुग्णांना सर्वतोपरी मदतीसाठी ते नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या सांगली पूरग्रस्तांना मदतीचा, लॉकडाऊनमध्ये गरजवंतांना किराणा किट वाटपाचा, कोरोना काळात परिश्रम घेणाऱ्या इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील परीचारकांचा त्यांनी केलेल्या यथोचित सन्मानाचा विशेष उल्लेख करावा लागेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट