पाटील भरणे नाही, आता ठाकरे भरणे वाद; अंकिता ठाकरे यांचा राज्यमंत्र्यांना ठाकरे शैलीत इशारा
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (३ फेब्रुवारी) :- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यातील राजकीय वाद इंदापूरकरांना काही नवा नाही. मात्र सध्या इंदापूर तालुक्यात चर्चा आहे ती बाळासाहेब ठाकरेंची नात सून अंकिता ठाकरे यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना ठाकरे शैलीत दिलेल्या आव्हानात्मक इशाऱ्याची. अंकिता ठाकरे यांनी निमसाखर गटातील विकास कामांच्या भूमीपूजनावेळी (१ फेब्रुवारी) सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पोलीस प्रशासनाचा वापर करत विकास कामाला अडथळा आणल्याचा आरोप करत, दडपशाहीचे राजकारण आपण चालू देणार नसल्याचा आव्हानात्मक इशारा थेट राज्यमंत्र्यांना दिला आहे. त्यामुळे शांत स्वभावाच्या आणि राजकारणाच्या कारकिर्दीत अपवाद वगळता वादविवादांपासून अलिप्त राहणे पसंत करणाऱ्या अंकिता पाटील यांच्यात ठाकरे घराण्याची सून झाल्याच्या अवघ्या काही दिवसांतच कोणालाही बिनधास्त भिडण्याची ठाकरी वृत्ती दिसू लागल्याची चर्चा इंदापूर तालुक्यात होऊ लागली आहे.
राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सदस्या भारती मोहन दुधाळ यांनी प्रशासनाला केलेल्या शिफारशी आणि पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या कौठळी (ता. इंदापूर) येथील तीन वर्ग खोल्यांच्या २२ लाख ५० हजारांच्या विकास निधीच्या कामाच्या भूमिपूजनाप्रसंगी राज्यमंत्र्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांसह पोलीस प्रशासनाचा वापर करीत विकासकामाला अडथळा निर्माण केला असल्याचा आरोप अंकिता ठाकरे यांनी भरणे यांच्यावर नाव न घेता केला असून, जिल्हा परिषद सदस्या भारती मोहन दुधाळ यांनी वेळोवेळी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून हे काम मंजूर करून घेतले असल्याचे म्हटले आहे. या कामाचे उद्घाटन अंकिता ठाकरे यांच्या हस्ते पार पडले असेल तरी, या कार्यक्रमात अडथळा आणण्यासाठी राज्यमंत्र्यांनी बळाचा व पोलीस प्रशासनाचा वापर केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. दडपशाहीच्या माध्यमातून आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा हा प्रकार चुकीचा असून, ही दडपशाही आपण कदापी चालू देणार नसल्याचे अंकिता ठाकरे यांनी म्हटले आहे.
सदरची कामे राज्यमंत्री भरणे यांच्या माध्यमातून झाली असून, १२ फेब्रुवारी रोजी राज्यमंत्र्यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्याचे नियोजन होते, मात्र अंधभक्तांनी ते हायजॅक केल्याचा आरोप राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. मात्र, आमचे नियोजन आणि आम्ही मंजूर केलेली कामे राष्ट्रवादीवाले पळवतात असे आरोप विरोधकांकडून अनेकदा झालेले आहेत. या आरोप प्रत्यारोपांमध्ये तथ्य असो नसो, मात्र कोणाचीही तमा न बाळगता शब्दांच्या शस्त्रांनी विरोधकांना घायाळ करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या नात सुनेने ठाकरी भाषेत विरोधकांना दिलेला इशारा २०२४ च्या विधानसभानामी युद्धात भरणेंना आव्हान देण्याच्या पूर्वतयारीचा भाग तर नसेल ना असा प्रश्न अनेकांना पडला नसेल तरच नवल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा