किंबहुना काट्याचा नायटा होण्याआधीच इलाज आवश्यक; हायवेवरील तो मातीचा ढिगारा ठरतोय धोकादायक
इंदापूर (३ सप्टेंबर) :- इंदापूर शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे सोलापूर महामार्गावर बुलेट शोरुमच्या समोर (एसबीआय बँकेच्या शेजारी) निष्काळजीपणे टाकण्यात आलेला मातीचा ढिगारा अपघाताची वाट बघत उभा आहे. नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावरच टाकण्यात आलेल्या या मातीच्या ढिगाऱ्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणारी एक लेन वाहतुकीसाठी बंद झाली असून, संबंधित प्रशासनाच्या, ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचे फलित एखाद्या अपघाताच्या स्वरूपात समोर येऊ शकते. त्यामुळे काट्याचा नायटा होण्याआधीच हा ढिगारा हटवणे गरजेचे आहे.
मागील अनेक दिवसांपासून याठिकाणी गटारीचे काम सुरू आहे. मात्र हे काम करत असताना संबंधित प्रशासन, ठेकेदार यांच्याकडून सुरक्षेची यथावश्यक काळजी घेण्यात आलेली नाही. काम तात्काळ पूर्ण करणे, काम पूर्ण होईपर्यंत वाहतुक दुसऱ्या लेनकडे वळवणे, संबंधित ठिकाणी बॅरीगेटिंग करणे, वाहनांना सहज लक्षात यावे अशा पद्धतीने सूचना फलक, रिफ्लेक्टर बसवणे अशा बाबी करणे आवश्यक होते. मात्र सर्व नियम संबंधित प्रशासन, ठेकेदाराकडून धाब्यावर बसवल्याचे दिसत आहे. त्यातच रात्री अपरात्री हा ढिगारा दिसून येत नाही. त्यामुळे वाहन वेगाने आल्यास, अथवा वाहनाला ओव्हरटेक करताना अपघात होऊ शकतो. विशेष म्हणजे कामाच्या ठिकाणी खेटूनच एकरभर मोकळे पटांगण आहे ही माती हायवेवरच का टाकली गेली याचे लॉजिक कळण्यापलीकडचे आहे. त्यातच सुरू असलेल्या पावसामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.
हे देखील वाचा - इंदापूरात वाढतोय चोरट्यांचा हैदोस
मागील अनेक दिवसांपासून हा मातीचा जीवघेणा ढिगारा तिथेच पडलेला आहे. प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि दुर्लक्षाचा फटका अपघात स्वरूपात इंदापूरकरांना अनेकवेळा बसला आहे. शेवटी अपघात झाल्यावर, एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होते ही बाबही इंदापूरकरांना नवी नाही. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास...!!! त्यामुळे अपघात झाल्यावर, अथवा एखाद्याचा जीव गेल्यावरच तो ढिगारा हटवला जाईल? किंबहुना अपघातासाठीच तर ही उठाठेव नाही ना? असा सवाल इंदापूरकरांना पडू लागला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा