कमी किमतीत टू व्हीलर देण्याच्या आमिषाने इंदापूर तालुक्यातील ३३ आशा सेविकांची फसवणूक


आरोपी आशा वर्कर्स संघटनेचा पदाधिकारी; इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (८ सप्टेंबर) :- नावाने श्रीमंत मात्र कर्तुत्वाने भिकारी असलेल्या आशा वर्कर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्याने टू व्हीलर देण्याच्या आमिषाने इंदापूर तालुक्यातील ३३ आशा स्वयंसेविकांची लाखोंची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या संदर्भात रेश्मा आलम सय्यद (रा. लुमेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी मंगळवारी (५ सप्टेंबर) इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेचा सरचिटणीस श्रीमंत बाबुराव घोडके (रा. कोथरूड, पुणे) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या तमाम आशा स्वयंसेविकांनी ३१ ऑगस्ट रोजी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्जही दिला होता. या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून, लवकरच तो आमच्या तावडीत सापडेल असे पोलिसांनी म्हटले आहे.

१० लाखांपेक्षा जास्त आशा स्वयंसेविका भारतातल्या ग्रामीण भागातल्या अहोरात्र झटत आहेत. कोव्हीड-19 च्या काळात केलेल्या कामाची दखल घेत WHO ने ग्लोबल हेल्थ लीडर अवॉर्ड २०२२ साठी भारतातल्या आशा वर्कर्सची निवड केली होती. ४ तासांची ड्युटी. मात्र या काळात दिवस रात्र त्या लोकांसाठी झटल्या. घरची सगळी कामं उरकून सकाळी साडेआठ वाजता कामाच्या ठिकाणी पोहोचायचं. माफक मानधनावर काम करताना कधी लसीकरणाची ड्युटी, तर कधी गावात जाऊन जनजागृती करण्याची. घर आणि कामाच्या ठिकाणामध्ये ३-४ किलोमीटरचं अंतर. खूपच पायपीट. याच पायपिटीचे सबब पुढे करून कमी किमतीत टू व्हीलर देण्याची संकल्पना आरोपी श्रीमंत घोडके याने मांडली होती.


याकामी आपली वाहन निर्मिती करणाऱ्या ५ वेगवेगळ्या कंपन्यांशी बोलणी सुरू असल्याचे सांगून आरोपीने संबंधित कंपनीकडून फंड आणि सवलत मिळवून कमी किमतीत टू व्हीलर मिळवून देण्याची हमी आशा स्वयंसेविकांना दिली होती. परिणामी कमी किमतीत टू व्हीलर मिळेल या आशेने तालुक्यातील ३३ आशा स्वयंसेविकांनी आरोपीला प्रत्येकी १८ हजार ३०० रु. प्रमाणे एकूण ६ लाख ३ हजार ९०० रु. दिले होते. मात्र दोन वर्ष उलटूनही टू व्हीलर न मिळाल्यामुळे आशा स्वयंसेविका आरोपीला वारंवार विचारणा करत होत्या. या करणांन्वये आरोपीने आशा स्वयंसेविकांना विश्वास बसावा यासाठी होंडा मोटार सायकल आणि स्कूटर इंडिया प्रा. लि. कंपनीचे बनावट लेटरही पाठवले होते. त्यामुळे आता या श्रीमंत भिकाऱ्याविरोधात आशा वर्कर्स यांनी पोलीस प्रशासनाकडे दाद मागितली आहे.

आरोपी आशा वर्कर्स संघटनेचा पदाधिकारी असल्याने, तसेच त्याच्या माध्यमातून आशा सेविकांच्या स्थापित कमिटीकडून स्वयंसेविकांचे मानधन ५०० रु. वरून ६ हजारापर्यंत वाढल्याने तालुक्यातील सर्व आशा सेविकांना आरोपीबाबत विश्वास संपादन झाला होता. याचाच फायदा घेत आरोपीने हे कृत्य केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट