रात्री अपरात्री घरांच्या खिडक्यांमध्ये घिरट्या घालणाऱ्या अज्ञात ड्रोनने इंदापूरकरांच्या चिंता वाढवल्या

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१२ सप्टेंबर) : - उजनी पाणलोट क्षेत्राच्या उत्तर पूर्व पट्ट्यासह इंदापूर तालुक्याच्या दक्षिण आणि पश्चिम भागात रात्री अपरात्री घिरट्या घालणाऱ्या अज्ञात ड्रोनने नागरिकांच्या चिंता वाढवल्या होत्या. मात्र आता इंदापूर शहरातही अज्ञात ड्रोन घरांच्या खिडक्यांमध्ये घिरट्या घालत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इंदापूर शहराच्या सरस्वतीनगर भागात मागील तीन चार दिवसांपासून अज्ञात ड्रोन घिरट्या घालत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र संबंधित प्रशासनाकडे याचे समाधानकारक उत्तर नसल्याने नागरिक चांगलेच चिंतेत दिसत आहेत.

साधारण आकाराचे हे ड्रोन रात्री ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान सरस्वतीनगर परिसरात घिरट्या घालत आहे. बारामतीच्या दिशेकडून एन्ट्री करणारे आणि त्याच दिशेने निघून जाणारे हे ड्रोन घरांच्या खिडक्यांमध्ये तासभर डोकावत असल्याचे, तसेच घिरट्या घालत घरांचा, परिसराचा चाखाचोळा घेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान इंदापूर शहरात वाढत्या चोऱ्यांचा, तसेच काही दिवसांपूर्वी सरस्वतीनगर परिसरात झालेल्या घरफोडीचा आणि या ड्रोनचा काही संबंध आहे का याचे उत्तर नागरिक शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी पोलिसांशीही संपर्क केला. तात्काळ ते आलेही. मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने, तसेच त्यानंतरही ड्रोनच्या घिरट्या सुरूच असल्याचे नागरिक सांगत आहेत.


बारामती येथे "कार्व्हर एव्हिएशन" या संस्थेकडून ड्रोन पायलट संबंधित प्रशिक्षण दिले जाते. या ड्रोनला Remotely Piloted Aircraft (RPA) असेही संबोधले जाते. साधारण ४०-५० किलोमीटर अंतरावरूनही हे ड्रोन हाताळता येऊ शकतात. त्यामुळे सरस्वतीनगरमध्ये घिरट्या घालणारा हा ड्रोन बारामती येथील "कार्व्हर एव्हिएशन" या संस्थेशी संबंधित आहे का? रात्री अपरात्री खिडक्यांतून डोकावण्याचा काय उद्देश? परिसरातील चोऱ्यांचा आणि याचा काही संबंध आहे का? अशा विविध प्रश्नांचा शोध घेऊन संबंधित प्रशासनाने नागरिकांना समाधानकारक उत्तर देणे गरजेचे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट