पत्नीनेच उधळला नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाचा डाव; पत्नीच्या धाडसामुळे इंदापूर तालुक्यातलं एक कुटुंब फसवणुकीपासून वाचलं

इंदापूर पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे आणि लग्न जमवणाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१९ सप्टेंबर) :- लग्नाचे फेरे घेत असताना ऐनवेळी मंडपात येऊन पतीच्या दुसऱ्या लग्नाचा डाव पत्नीनेच उधळल्याचा सीन अनेकवेळा आपण चित्रपटात पाहिला आहे. मात्र अशीच एक घटना इंदापूर तालुक्यातही घडली आहे. पहिले लग्न होऊनही दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यासाठी आतुर झालेल्या नवऱ्याचा हा डाव पत्नीनेच उधळून लावला. पहिली पत्नी आणि होणारी दुसरी पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांना अंधारात ठेवणारा फसवा पती अभिजित बाबुलाल सरतापे, सासू संगीता बाबुलाल सरतापे, सासरा बाबुलाल महादेव सरतापे (सर्व रा. धुळदेव, ता. माण, जि. सातारा) आणि सर्व हकीकत माहिती असूनही लग्नासाठी स्थळ आणणारा व बिंग फुटताच पळ काढणारा दत्तात्रय रामचंद्र गायकवाड (रा. पिंपरी बु. ता. इंदापूर, जि. पुणे) अशा चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपटात शोभेल अशा या घटनेसंदर्भात मुलीच्या वडिलांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रुपाली महादेव ढवळे (रा. म्हसवड, ता. माण, जि. सातारा) यांचे आरोपी अभिजित याच्याशी जुलै २०२० मध्ये पुसेगाव (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील बुद्ध विहारात लग्न झाले होते. मात्र पतीच्या दुसऱ्या लग्नाची लग्नपत्रिका हाती पडताच रुपाली यांनी पतीच्या होणाऱ्या दुसऱ्या सासरवाडीत येऊन सर्व हकीकत उजेडात आणली. रुपाली ढवळे यांनी अभिजित याला ऑन द स्पॉट कॉल केला. "तू लग्न करत आहेस, तू मला विसरून जाशील असं त्याला म्हटलं. यावर आरोपी अभिजित याने "मी हे लग्न नावाला करत आहे. मी फक्त तुझाच राहणार आहे" असं रुपाली यांना उत्तर दिलं. दोघांदरम्यान मोबाईलवर झालेलं हे संभाषण रुपाली यांनी लाऊडस्पिकर चालू करून मुलीच्या कुटुंबीयांना ऐकवलं. यावेळी सर्व पिक्चर क्लिअर झाले.

दरम्यान दुसरे लग्न जमवणारा आरोपी दत्तात्रय गायकवाड याला अकलूज (ता. माळशिरस) येथे भेटण्यासाठी बोलावून मुलीच्या वडिलांनी त्याला सर्व हकीकत विचारली. यावेळी "अभिजितचे पहिले लग्न झाले नाही. कोण म्हणतंय त्याला माझ्या समोर आणा" असं दरडावून विचारणारा आरोपी दत्तात्रय गायकवाड शेजारीच बसलेली पहिली पत्नी समोर येताच तेथून पळून गेला. दुसऱ्या लग्नाचे मुहूर्त ठरले होते. सर्व तयारीही झाली होती. रुपाली ढवळे यांनी वेळेवर दाखवलेल्या धाडसामुळे इंदापूर तालुक्यातलं एक कुटुंब मोठ्या संकटातून वाचलं हे नक्की.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट