हिप्नाॅटीजम प्रकरणातील त्या महिलेवर जादूटोणा विरोधी कलम वाढविण्याची मागणी इंदापूर न्यायालयाने फेटाळली; आरोपी पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद धरला ग्राह्य

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१ सप्टेंबर) :- मागील काही दिवसांपासून इंदापूर शहरात चर्चेचा विषय ठरलेल्या हिप्नाॅटीजम प्रकरणातील आरोपी महिलेला अखेर इंदापूर दिवाणी व फौजदारी न्यायालयाने शुक्रवारी (१ सप्टेंबर) जामीन मंजूर केला. ५० हजारांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. एल. पाटील यांनी  हा जामीन मंजूर केला असून, आरोपीवर जादूटोणा विरोधी कलम लावण्याची फिर्यादी पक्षाच्या सरकारी वकिलांची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली. माया सागर साळुंखे (रा. ५८ फाटा, माळशिरस, जि. सोलापूर) असे या आरोपी महिलेचे नाव असून, २७ ऑगस्ट रोजी मुत्सुद्देगिरीने लावलेल्या बातमीच्या परिणामी ही महिला २८ ऑगस्ट रोजी इंदापूर शहरातील अकलूज ब्रीजनजीक अटक झाली होती. तर २९ ऑगस्ट रोजी न्यायालयाने तिला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

या महिलेवर इंदापूर शहरातील राजेवलीनगर भागातील एका महिलेची देवीच्या नावावर भोंदूगिरी आणि हातचलाखी करत फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. २३ ऑगस्ट रोजी घडलेल्या या प्रकारानंतर तिने हिप्नाॅटीजम करून संबंधित महिलेला लुबाडले असल्याच्या जोरदार अफवाही शहरात पसरल्या होत्या. परंतु फिर्यादी तथा फसवणूक झालेल्या दिपाली लक्ष्मण खरात (रा. राजेवलीनगर, इंदापूर) यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानंतर हे हिप्नाॅटीजम वगैरे काही नसून, देवीच्या नावावर केलेली भोंदुगिरी, हातचलाखी आणि फसवणूक असल्याची बाब समोर आली होती.

वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण - छे छे ... हिप्नाॅटीजम वगैरे काही नव्हतं, ही तर भोंदूगिरी, हातचलाखी आणि फसवणूक

दरम्यान, फिर्यादी आणि आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. यावेळी फिर्यादी पक्षाच्या वकिलांकडून आरोपीवर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि जादूटोणा अधिनियम २०१३ हे कलम वाढविण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. मात्र आरोपी पक्षाचे वकील ॲड. आशुतोष तानाजी भोसले यांनी केलेल्या जोरदार युक्तिवादानंतर न्यायालयाने फिर्यादी पक्षाची ही मागणी फेटाळून लावली. या प्रकरणात ॲड. सोहम घोडके यांनी ॲड. भोसले यांना सहकार्य केले.

फिर्यादी व सरकारी पक्षाने या संदर्भात केलेला युक्तिवाद

हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आसपासचा परिसर सोडून एवढ्या लांब परडी घेऊन येण्याचा आरोपीचा उद्देश काय? महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम २०१३ अन्वये हा अपराध असून, आरोपीवर हे वाढीव कलम लावण्यात यावे. आरोपी पळून गेल्यास ती पुन्हा हजर होईल यात साशंकता आहे. त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडीत ठेवणे गरजेचे आहे.

आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात केलेला युक्तिवाद

फिर्यादी ह्या ३३ वर्ष वयाच्या, सज्ञान आणि सुशिक्षित महिला आहेत. त्या स्वतः अशा प्रकारे भूलथापा किंवा अन्य आमिषांना बळी पडतील हे सांगणेच मुळात न पटणारे आहे. साधारणतः आराधी असणाऱ्या महिला एकाच प्रकारचा पोशाख घालतात. या महिलांची एकच रूपरेषा व एकसारखाच पोशाख असल्याने ही तीच महिला असण्याबद्दल शंका निर्माण होत आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट