इंदापूरच्या ऐतिहासिक हजरत चाँदशाहवली दर्ग्याची आणि उरुसाची वैशिष्ट्ये प्रत्येक इंदापूरकरांना माहित हवी (विशेष लेख)
| रोषणाई करण्यात आलेली चाँदशाहवली यांची दर्गाह |
सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान, इंदापूरच्या धार्मिक व सांस्कृतिक इतिहासाचे सुवर्ण पान आणि एकूणच इंदापूरचे वैभव असलेल्या ऐतिहासिक अशा हजरत चाँदशाहवली दर्ग्याच्या ४५७ व्या उरूसाला कालपासून (११ डिसेंबर, मार्गशीर्ष ८) सुरुवात झाली. भारतीय पंचांगातील मार्गशीर्ष या नवव्या महिन्यात साजरा केला जाणारा हा उरूस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीही शासनाच्या नियमांनुसार आणि अत्यंत साध्यापणाने मात्र पारंपारिक पद्धतीने साजरा होत आहे. काल संदलचा कार्यक्रम पार पडला, आज उरुसाचा मुख्य दिवस (१२ डिसेंबर, मार्गशीर्ष ९) असून, उद्या (१३ डिसेंबर, मार्गशीर्ष १०) झेंड्याच्या (ग्रामप्रदक्षिणा) निमित्ताने हा उरुसोत्सव इंदापूर शहरात एकूण तीन दिवस चालणार आहे. या ऐतिहासिक दर्ग्याचा उरूस कसा पार पडतो, काय काय आहेत याची ठळक वैशिष्ट्ये याबाबत माहिती देणारा मासिक मुत्सुद्देगिरीचे उपसंपादक समीर सय्यद यांचा हा विशेष लेख.
दर्गाह कोणी आणि कोणत्या साली बांधली?
चाँदखान शाह असे मूळ नांव असलेल्या या वलींची दर्गाह कोणी आणि कोणत्या साली बांधली याबाबत सबळ पुरावे आमच्याकडे उपलब्ध नाहीत. मात्र याबाबत लोकांशी चर्चा केली असता लोकांमध्ये वेगवेगळी मतमतांतरे आढळून आली. कोणी ही दर्गा १७ व्या शतकात अर्थात मालोजीराजेंच्या काळात मालोजीराजेंनी बांधली असल्याचे सांगितले, तर कोणी शहाजी राजेंकडे ही दर्गाह बांधल्याचा इशारा केला. मात्र या दर्ग्याचे मुजावर दर्ग्याचा निर्माणकाळ १०००-१२०० वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगतात. सन १९२५-१९३१ या सहा वर्षांदरम्यान ताजुद्दीन अजमुद्दीन सय्यद, कुतुब लालभाई शेख (शेख कुतुब शेखलाल), यशवंत नारायण देशपांडे, गोविंद नारायण घोडके या पंच कमिटीतील लोकांनी लोकवर्गणीतून या दर्ग्याचा जीर्णोद्धार केला. यासंबंधीचा फलक दर्ग्याच्या प्रवेशद्वारावर लावलेला आढळतो.
| प्रवेशद्वारावरील फलक |
गल्लफ (चादर) चढविण्याचा पहिला मान इंदापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला
अनेक वर्षांचा इतिहास असलेल्या या दर्ग्याच्या पश्चिमेला (पाठीमागे) मालोजीराजेंची जीर्ण अवस्थेत असलेली ऐतिहासिक गढी असून, असे म्हटले जाते की, मालोजीराजेंच्या हयातीत उरुसाच्या दिवशी गल्लफ (चादर) चढवण्याचा पहिला मान मालोजीराजे यांना असायचा. नंतर ब्रिटिशांच्या काळापासून हा मान पोलीस प्रमुखाला दिला जाऊ लागला. काही वर्षांपर्यंत दर्ग्याच्या उत्तर दिशेला अंदाजे ३० मीटरवर पोलीस ठाणे होते. नंतर ते पुणे सोलापूर हायवेवर स्थलांतरित करण्यात आले. मात्र आजही त्या ठिकाणी ब्रिटिश कालीन जेल अस्तित्वात आणि वापरात आहे.
| मालोजीराजेंची दुर्लक्षित व जीर्ण झालेल्या गढीचा भाग |
आता दरवर्षी इंदापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना हा मान दिला जातो. परंपरेने चालत आलेली ही प्रथा यावेळी इंदापूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्या हस्ते पार पडली.
| चादर घेऊन जाताना पोलीस अधिकारी व भाविक |
संदल तयार करण्याचा मान हमीदभाई आतार यांच्या घराण्याकडे
अनेक पिढ्यांपासून संदल तयार करण्याचा मान सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार यांच्या घराण्याकडे आहे. चंदनाच्या लाकडाला उगाळून हा संदल तयार केला जातो. उरुसाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गल्लफ घेऊन पोलीस ठाण्यापासून चालत आतार यांच्या घरासमोर येतात. तदनंतर तयार केलेला संदल आणि गल्लफ घेऊन सर्वजण वाजत गाजत दर्ग्याकडे जातात. चंदनाचा संदल आणि गल्लफ बाबांच्या कबरीवर चढवला जातो.
| पोलीस अधिकारी व हमीदभाई आतार संदल व गल्लफ घेऊन जाताना |
झेंड्याचा मान रामोशी समाजाकडे
उरुसाच्या तिसऱ्या दिवशी जियारत झाल्यानंतर सायंकाळच्या समयी झेंडा घेऊन ग्रामप्रदक्षिणा घातली जाते. हा झेंडा दर्ग्यातून घेऊन येण्याचा मान रामोशी समाजाकडे, तर प्रदक्षिणेदरम्यान झेंडा पकडण्याचा मान संतोष भंडलकर यांच्या घराण्याकडे असतो.
उरुसाच्या काळात नगारे वाजवण्याची होती परंपरा
मार्गशीर्ष महिना सुरू होताच पहाटे आणि सायंकाळी दर्ग्यावर मोठमोठे नगारे वाजवले जायचे. त्यामुळे ग्रामवासीयांना उरूसाची पूर्वकल्पना मिळायची. हा मान मुनिर कुरेशी यांच्या घराण्याकडे आहे. मागील काही वर्षांपासून ही पद्धत बंद पडली आहे. दर्गाह परिसरात आज देखील हे नगारे पाहायला मिळतात. यावर्षी या नगाऱ्यांना चामडे बसवून त्याची दुरुस्तीही करण्यात आली आहे.
| नगाऱ्याचे अवशेष |
कोरोनाच्या नियमांचे पालन करून दर्शनास यावे
संदल, दर्शनाचा मुख्य दिवस आणि शेवटच्या दिवशी झेंड्याची ग्रामप्रदक्षिणा, असा हा उरूसोत्सव तीन दिवस चालतो. नारळ आणि गव्हाच्या पीठाचा मलिदा नैवेद्य म्हणून चढवला जातो. सलग तिसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झेंड्याची ग्रामप्रदक्षिणा मोजक्याच लोकांसहित पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घरूनच दर्शन घ्यावे अथवा गर्दी न करता कोरोनाच्या नियमांचे पालन करून दर्शनास यावे असे आवाहन दर्ग्याचे विश्वस्त आणि उरूस कमिटीच्या सदस्यांकडून करण्यात आले आहे. कोरोनाचे नियम पाळण्यासंदर्भात फलकही लावण्यात आला आहे.
| कोरोना नियमासंदर्भात लावण्यात आलेला फलक |
डोळ्यांचे पारणे फेडणारी फटाक्यांची आतिषबाजी
लोकांच्या आकर्षणाचे मुख्य कारण असलेली शेवटच्या दिवशी आकाशात होणारी फटाक्यांची आतिषबाजी पाहण्यापासूनही इंदापूरकरांना पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारी ही फटाक्यांची आतिषबाजी इंदापूरकरांना पाहायला मिळणे ही, चांद यासिनभाई शेख आणि मुबारक कुतुबभाई शेख, खलील गुलाबभाई शेख यांच्या मेहनतीचा परिणाम होती. यांच्यानंतर त्यांचे कुटूंबीय ही जबाबदारी पार पाडत आहेत.
कव्वालीची मैफिल, आर्केस्ट्रा आणि कुस्त्यांचा फड
उरुसाच्या शेवटच्या दिवशी लोकांच्या मनोरंजनासाठी दर्ग्याच्या उत्तरेस असलेल्या मोकळ्या जागेत कव्वालीची मैफिल, आर्केस्ट्रा आणि कुस्त्यांचा फड रंगायचा. मागील अनेक वर्षांपासून ही प्रथा संपुष्टात आली आहे. अंदाजे १००-१२५ वर्षांपूर्वी कुस्ती दरम्यान एका पैलवानाचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जाते. आजही त्या ठिकाणी कबर अस्तित्वात आहे. मात्र या पैलवानाबाबत अथवा कबरीबाबत अधिक माहिती आम्हाला मिळू शकली नाही.
| पैलवानाची कबर |
उरुसासाठी सबंध महाराष्ट्रातून भाविक इंदापूरमध्ये येतात
मालोजीराजेंची जहागिरी असलेल्या ऐतिहासिक इंदापूर शहरातील धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात अनन्य साधारण महत्व असलेल्या इंदापूरचे हजरत चाँदशाहवली या ऐतिहासिक दर्ग्याचा उरुस दरवर्षी मार्गशीर्ष या मराठी महिन्यात साजरा केला जातो, ज्यामध्ये इंदापूर तालुक्यासह, बारामती, माळशिरस, पंढरपूर, माढा, करमाळा, पुरंदर, दौंडसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. अनेक भाविक न चुकता दरवर्षी उरुसासाठी इंदापूरमध्ये येत असतात.
| दर्ग्यात येणाऱ्या भाविकांना आशीर्वाद देताना फकीर बाबा |
संपूर्ण महाराष्ट्रातून छोटे छोटे व्यापारी इंदापूरमध्ये
उरुसानिमित्त दर्ग्याच्या समोर (पूर्वेकडे) तीन दिवस वेगवेगळ्या गृहोपयोगी वस्तूंची, मिठाईची दुकाने थाटली जातात. संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक छोटे व्यापारी खेळण्याची, पाळण्याची, कपड्याची, रेवडी, मिठाई आणि विविध प्रकारची छोटी छोटी दुकाने दर्गाह परिसरात थाटत असतात. विशेषतः करमाळ्याची रेवडी या बाजारात खूप प्रसिद्ध होती. अनेक पिढ्यांपासून करमाळकर म्हणून इंदापूरकरांमध्ये प्रसिध्द असलेले करमाळ्याचे व्यापारी उरुसानिमित्त रेवडी विक्रीसाठी इंदापूरमध्ये येत आहेत. संभाजी चौकातील तलाठी कार्यालयासमोर त्यांची दुकान दरवर्षी थाटलेली असते. या दुकानांमुळे तीन दिवस या परिसरात लोकांची गजबज असते. त्यामुळे तीन दिवसांत लाखोंची उलाढाल या बाजारात होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम आणि व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने बाजार रुपात उरूसाची रौनक यावर्षीही फिकीच दिसत आहे. केवळ मोजकी दुकाने दर्ग्यासमोरील परिसरात दिसत आहेत.
| तलाठी कार्यालयासमोर थाटलेले रेवडीचे दुकान |
| मेहनती व्यापारी योगेश गोरे आणि महेश जामदार यांनी संभाजी चौकात थाटलेले दुकान |
| उरुसानिमित्त थाटलेली इतर दुकाने |
हजरत चाँदशाहवली दर्गाह हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक
पूर्वी पंच कमिटीत असणारे देशपांडे, घोडके, दरवर्षी उरूस कमिटीत राहून सेवा करणारे निवृत्त प्रा. महादेव चव्हाण, १९१७ मध्ये केशव लक्ष्मण कदम यांनी दर्ग्यासाठी वक्फ (इनाम) केलेली अनेक एकर जमीन, पाण्यासाठी प्रदीप जामदार यांनी दर्ग्यासाठी स्वखर्चातून मारून दिलेले बोअरवेल, रामोशी समाज आणि भंडलकर यांना असलेला झेंड्याचा मान, ही उदाहरणे इंदापूर शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याच्या केंद्रस्थानी चाँदशाहवली दर्गाह असल्याचे एक उत्तम उदाहरण आहे. विशेष म्हणजे या परिसरात पुरातन जुमा मस्जिद, ग्रामदैवत इन्द्रेश्वराचे मंदिर आणि ही दर्गाह एकमेकांच्या अवघ्या काही मीटर अंतरावर आहे.
| उरुसाप्रसंगी प्रकाशासाठी वापरण्यात येणाऱ्या दिवट्या |
अशा पध्दतीने या ऐतिहासिक दर्ग्याचा उरूस दर्ग्याचे विश्वस्त व पुजारी जाफर मुजावर, महमूद मुजावर, शकील मुजावर, मुनिर मुजावर, सलीम मुजावर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब, उरूस कमिटीचे अध्यक्ष आझाद पठाण, उपाध्यक्ष व हिंदू मुस्लिम ऐक्याचा महत्वाचा धागा असलेले प्रा. महादेव चव्हाण, शेरखान पठाण, आणि इतर सर्व हिंदू मुस्लिम ग्रामस्थांच्या मदतीने दरवर्षी उरूसाचा कार्यक्रम पार पाडला जातो.
हा लेख तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की कळवा.
👌
उत्तर द्याहटवाVery important Histrolical information.
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर माहिती मिळाली ....... ✌👏 धन्यवाद .....
उत्तर द्याहटवाआयुष्यात पहिल्यांदाच या ऊरूसाविषयी सखोल माहीती वाचण्याचा प्रसंग आला। याबाबत समीर सय्यद कौतुकास पात्र ठरतात! धन्यवाद!
उत्तर द्याहटवासुंदर आणि महत्वपूर्ण माहिती साहेब
उत्तर द्याहटवा