इंदापूर तालुक्यातील कोरोनाची आजची परिस्थिती; लॉकडाऊन टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (२६ मार्च) : कोरोनाबाबतीत स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली असून, देशभरातील टॉप १० शहरात महाराष्ट्रातील पुण्यासह ९ शहरांचा समावेश आहे. इंदापूर लगत असलेल्या सोलापूर जिल्ह्यात निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. तर अनेक निर्बंधानंतरही बारामतीची रुग्णसंख्या वाढत असल्याने बारामतीची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने होऊ लागली आहे. इंदापूर तालुक्यातही सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्या अर्धतकापार गेल्याने आरोग्य विभागासह एकूणच प्रशासनावर दबाव वाढला आहे. प्रशासनाकडून कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे, मात्र लॉकडाऊनची नामुष्की पुन्हा येऊ नये यासाठी इंदापूरकरांनी काळजी घेणे तसेच प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे बारामतीसह पूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊनच्या गर्तेत जातो की काय अशी हालत निर्माण झाली असून, सोलापूर जिल्ह्यातही दुकानांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. शनिवार व रविवारी लॉकडाऊन असणार आहे. तर रात्री ७ च्या पुढे कलम १४४ लागू असेल. इंदापूर तालुक्यातही काल आढळलेल्या ६१ रुग्णांसहित सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्या साठीच्या घरात गेल्याने हळूहळू प्रशासनाच्या हालचाली वाढल्याचे दिसत आहे. शासकीय रुग्णालयात रुग्णसंख्या क्षमतेपेक्षा जास्त होऊ लागल्याने दुधगंगा डेअरी समोरील कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तर रुग्णांना होम कॉरंटाईन करण्याची सिस्टमही आता बंद करण्यात आल्याची माहिती डॉ. चंदनशिवे यांनी दिली आहे.
कोरोनाची एकंदरीत स्थिती दर्शवणारा फलक
काल (२५ मार्च) दिवसअखेर इंदापूर तालुका आणि तालुक्याबाहेर करण्यात आलेल्या आरटीपिसीआर व अँटिजिन चाचण्यांमध्ये ६१ जण कोरोना बाधित आढळले आहेत, ज्यामध्ये ग्रामीण भागातील ४७ तर शहरातील १४ जणांचा समावेश आहे. त्यामुळे आजतागायत एकूण रुग्णसंख्या आता ६००४ वर पोहोचली असून, ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ४०१ एवढी झाली आहे. ज्यामध्ये ग्रामीणच्या ३१८ तर शहारातील ८३ जणांचा समावेश आहे. तर रुग्णांचा डब्लिंग रेट (१.४४) व मृत्यूदर (२.९५) शहराचाच जास्त असल्याने लॉकडाऊनची नामुष्की टाळायची असेल तर शहरातील नागरिकांनी निष्काळजी न राहता सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे व इतर काळजी घेत प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.







टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा