इंदापूर तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती? पहा आकडेवारी
इंदापूर (२३ मार्च) : इंदापूर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने इंदापूरकरांच्या चिंतेत भर पडू लागली आहे. एकंदरीत परिस्थिती 'कंट्रोल में' असली तरी, नागरिकांचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाच्या निवांतपणामुळे कोरोना एंट्रीच्या वर्षपूर्तीनंतरही गतवर्षीसारखीच गत आताही होईल की काय असे वाटू लागले आहे. त्यामुळे इंदापूरकरांची इच्छा असो वा नसो मात्र कोरोना होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर तुघलकी लॉकडाऊनच्या वर्षपूर्तीनंतरही आपल्याला फिरून पुन्हा भोपळा चौकात यावे लागणार आहे.
२०२० मधील 'सर्वात निगेटिव्ह शब्द पॉसिटीव्ह' पुन्हा चर्चेत येत आहे. सध्या इंदापूर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दररोज ६० च्या घरात वाढत असून, अख्खी कुटुंबे कोरोनाबाधित होत आहेत. कोरोना वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर कोरोनाबाबत बंद झालेल्या कोण, कुठे, कधी पॉसिटीव्ह आला? या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. मात्र अजूनही नागरिक आणि पोलीस प्रशासनामध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर इक्का दुक्का ठिकाणी कार्यवाहीचा लपंडाव वगळता 'तेरी भी चूप मेरी भी चूप' अशी परिस्थिती सध्यातरी दिसत आहे. शासकीय रुग्णालयात बेडची संख्या फुल होऊ लागल्याने, सद्य परिस्थिती पाहता इंदापूर शहरातील बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. एकंदरीत नागरिकांचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाचा निवांतपणा कोरोनापूरक परिस्थिती निर्माण करू लागला आहे. अशीच परिस्थिती काही दिवस राहिल्यास सर्वांनाच नको असलेला निष्पन्नशून्य लॉकडाऊन पुन्हा माथी मारला जाऊ शकतो.
कोरोनाची एकंदरीत स्थिती दर्शवणारी आकडेवारी
गतवर्षी २८ एप्रिलला इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये तर इंदापूर शहरात ५ जूनला पहिला रुग्ण आढळला होता. तदनंतर काल (२२ मार्च) दिवसअखेर करण्यात आलेल्या २८,२०७ चाचण्यांमध्ये एकूण रुग्णसंख्या ५८३७ इतकी होती. यामध्ये ग्रामीण भागातील ४९०५ तर शहरातील ९३२ रुग्णांचा समावेश आहे. काल कोरोनाच्या खात्यात ५४ जणांची भर पडली होती. यामध्ये ग्रामीण भागातील ४२ तर शहरातील १२ रुग्णांचा समावेश आहे. काल दिवसअखेर १५२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, यामध्ये ग्रामीण भागातील १२३ तर शहरातील २९ जणांचा समावेश आहे. इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोनाचा मृत्यूदर २.५० टक्के तर शहरात हाच दर २.६० टक्के एवढा आहे. एकूण रुग्णसंख्येपैकी काल तागायत ५३८४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या तालुक्यातील रुग्णसंख्या ३०१ एवढी अत्यल्प असली तरी, नागरिकांचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाचा निवांतपणा इंदापूरकरांना नडणार की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.








टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा