निमगाव केतकीमध्ये विविध संघटनांकडून रेशनकार्ड हमीपत्राची होळी


निमगाव केतकी प्रतिनिधी

निमगाव केतकी (२६ मार्च) : बोगस शिधापत्रिका शोधकामी स्वस्त धान्य दुकानदार भरून घेत असलेल्या हमी पत्राविरोधात इंदापूर तालुक्यातील वातावरण चांगलेच तापू लागले असून, आज निमगाव केतकीमध्ये बहुजन मुक्ती पार्टी, अखिल तेली समाज संघटना आणि शेतकरी संघटनेकडून संयुक्तरित्या सर्व स्वस्त धान्य दुकानांबाहेर हमीपत्राची होळी करण्यात आली. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग, अखिल तेली समाज संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष व राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन देशमाने, बहुजन मुक्ती पार्टीचे निमगाव केतकी शहराध्यक्ष भारत मिसाळ, सागर मिसाळ, संतोष जगताप, दादा आदलिंग, हनुमंत पवार, मंगेश घाडगे, बाळू शहाणे, आणि मोठ्या संख्येने निमगावकर उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या आदेशान्वये इंदापूर तालुक्यात सध्या बोगस शिधापत्रिका शोधण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकांकडून गॅस कनेक्शन नसल्याबाबत हमीपत्र लिहून घेत आहेत. त्याआधारे गॅस कनेक्शन असणाऱ्यांचे धान्य बंद केले जाणार आहे. या प्रक्रियेवर आज निमगाव केतकीमध्ये रेशन दुकानांसमोर विविध संघटनांकडून करण्यात आलेल्या हमीपत्र होळीच्या प्रसंगी अखिल तेली समाज संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष व राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन देशमाने यांनी, या प्रक्रियेवर टीका करताना, या हमीपत्राआधारे केंद्र सरकार गरीब लोकांना जगण्यासाठी लागणारे थोडे थोडके धान्यही बंद करणार असल्याने गरिबांपुढे मोठे संकट निर्माण होणार आहे. उज्वला योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांना अवघ्या शंभर रुपयांत गॅस कनेक्शन मात्र सिलेंडरमागे मिळणारे अनुदान रद्द करून गरिबांचा स्वयंपाक महाग करणारे केंद्र सरकार आता या हमीपत्राच्या माध्यमातून गरिबांचे धान्यच बंद करण्याचे षडयंत्र करत असल्याने या महाग सिलेंडर मुफ्त गॅसवर काय शिजवायचे असा सवाल उपस्थित केला आहे.

हे देखील वाचा - इंदापूर तालुक्यातील कोरोनाची आजची स्थिती; नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित

याप्रसंगी बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग यांनी देखील प्रतिक्रिया देताना, ग्लोबल हंगर इंडेक्स या संस्थेच्या अहवालानुसार भारतात भूकबळीमुळे लाखोंचा बळी जात असताना केंद्र सरकारचे गरिबांना उपाशी मारण्याचे धोरण निषेधार्ह असल्याने याचा निषेध म्हणून बहुजन मुक्ती पार्टी यांच्या वतीने व अखिल तेली समाज संघटना शेतकरी संघटना यांच्या वतीने आज निमगाव केतकी येथील रेशन दुकाना समोर शासनाच्या हमी पत्राची होळी करत असल्याचे म्हटले.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट