वाळू माफियांवर भिगवण पोलीसांची मोठी कार्यवाही; परप्रांतीय मजुरांच्या साहाय्याने चालू होता अवैध वाळू उपसा
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)
भिगवण (१४ मार्च) : पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशान्वये भिगवण पोलीसांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर धडक कार्यवाही केली असून, आज (१४ मार्च) रात्री ३.१५ मी. सुमारास परप्रांतीय मजुरांच्या मदतीने भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिक्सळ गांवाच्या उजनी पाणलोट क्षेत्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर भिगवण पोलीसांनी केलेल्या आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या कार्यवाहीमुळे इंदापूर तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. यामध्ये ६ बोटींसह इतर यांत्रिक साधनसामग्री असे एकूण १ कोटी २ लाख ८० हजार रुपयांची साधन सामग्री महसूल विभागाकडून नष्ट करण्यात आली आहे.
काल (१३ मार्च) भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांना गोपनीय सूत्रांकडून भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या डिक्सळ गांवाच्या हद्दीत असणाऱ्या उजनी पाणलोट क्षेत्रात परप्रांतीय मजुरांच्या मदतीने अवैध वाळू उपसा करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने जीवन माने यांनी आज (१४ मार्च) रात्री ३.१५ मी. सुमारास आपल्या स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता झारखंड राज्यातील अनेक परप्रांतीय मजुरांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले.
सदर ठिकाणी वाळू उपसा करण्याकामी वापरण्यात आलेल्या फायबरच्या ४ बोटी (प्रत्येकी किंमत २० लाख रु.), लहान हायड्रॉलिक २ बोटी (प्रत्येकी किंमत १० लाख रु.) जिलेटीनच्या साहाय्याने तर या बोटींवर अवैध उपसा केलेली एकूण ५६ ब्रास वाळू (एकूण किंमत २ लाख ८० हजार रु.) असा एकूण १ कोटी २ लाख ८० हजारांचा माल महसूल विभागाकडून नष्ट करण्यात आला आहे. सदरच्या बोटी ह्या मधू गोडसे, बाबू मोरे (दोघेही रा. शिरापूर, ता दौंड, जि. पुणे) आणि गणेश यादव (रा. कात्रज, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्या असल्याची माहिती परप्रांतीय मजुरांनी दिली आहे. मात्र अंधार आणि किनाऱ्यावर असल्याचा फायदा घेत या तिघाही बोट मालकांनी घटनास्थळावरून पोबारा केला आहे. या घटनेतील आरोपींवर भिगवण पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ४९९, ३७९, ४११, ३४, पर्यावरण अधिनियम कलम ९, १५, मालमत्ता विद्रुपीकरण कलम ४ आणि गौण खनिज कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरच्या कार्यवाहीमध्ये पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय जाधव, पोलीस हवालदार इन्कलाब पठाण, पोलीस नाईक समिर करे, पोलीस हवालदार वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल निबांळकर, चालक पोलीस कॉन्स्टेबल भाडवरलकर, सहाय्यक फौजदार काळभारे यांनी केली आहे.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा