इंदापूर पोलीसांचा अवैध वाळू विक्रेत्यांवर कार्यवाहीचा धडाका सुरूच; अवैध वाळूसह २५ लाखांचा मुद्देमाल जप्त
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)
गुरुवार (११ मार्च) : अवैध वाळू विक्रेत्यांवर इंदापूर पोलीसांच्या कार्यवाहीचा धडाका सुरूच असून, वाटलूज भागातील उजनी जलाशयात अवैध वाळू उपसा करून पळसदेव परिसरात विक्रीसाठी आणलेल्या एका अज्ञात ट्रक चालकावर कार्यवाही करत इंदापूर पोलीसांनी भा.द.वि.क. ३७९, प.अ.कलम ९ व १५ सह सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कलम ४, गौण खनिज अधिनियम कलम ३ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कार्यवाहीत तब्बल २५ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ही वाळू कोणी, कुठून आणि कोणासाठी आणली होती याचा अधिक तपास पोलीस हवालदार दीपक पालके करत आहेत.
६ मार्च रोजी कांदलगांव परिसरातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कार्यवाही करत इंदापूर पोलीसांनी तब्बल ५६ लाख रु. मुद्देमाल जप्त केला होता. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या नेतृत्वाखाली अवैध वाळू विक्रेत्यांवर धडक कार्यवाहीचा इंदापूर पोलीसांचा हा धडाका अद्यापही सुरूच असून, पळसदेव, काळेवाडी आणि लोणी देवकर हा भाग इंदापूर पोलीस ठाण्यापासून लांब असल्याचा अभ्यास करून याचा फायदा घेत विक्रीसाठी आणलेली अवैध वाळू ट्रकसह इंदापूर पोलीसांनी काल रात्री ९.३० वा. सुमारास कार्यवाही करत जप्त केली आहे.
ही वाळू उजनी जलाशयातून (वाटलुज परीसर) उत्खनन करून ती पळसदेव परीसरात विक्री करण्यासाठी समीर एंटरप्राइजेस असे नांव लिहिलेल्या ट्रकमध्ये (एमएच १६ क्यू ४६२२) आणण्यात आली होती. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दीपक पालके यांनी ट्रकसह २५ लाख २४ हजार रु. चा मुद्देमाल जप्त केला आहे. ट्रकचालक अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला असून, या अज्ञात ट्रक चालकाविरोधात पोलीस कॉन्स्टेबल विनोद दासा मोरे यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि.क. ३७९, प.अ.कलम ९ व १५ सह सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कलम ४ आणि गौण खनिज अधिनियम कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या ट्रकचा चालक आणि मालक कोण?, ट्रकमध्ये आणलेली वाळू नक्की कोठून भरली? त्याचा आणखी साठा आहे का? ही वाळू कोणास विक्री करण्यासाठी आणली होती? याबाबत ट्रकचालक व मालक यांचा शोध घेऊन सखोल तपास करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी तपासी अंमलदार दीपक पालके यांना दिल्या आहेत.





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा