रेशनकार्ड शिक्षक-प्रशासन वाद पेटवणार; शिक्षकांचा तहसीलदारांच्या आदेशावर बहिष्कार

शिक्षकांवर ओढवणार नागरिकांचा रोष; स्वाभिमानी शिक्षक परिवाराचा तुघलकी फर्मानाला विरोध

समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)

इंदापूर (१८ मार्च) : स्वाभिमानी शिक्षक परिवाराने बोगस शिधापत्रिका शोध मोहिमेवर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केल्याने, आता रेशनकार्डावरून शिक्षक आणि प्रशासनादरम्यान वाद पेटणार असल्याचे दिसत आहे. शैक्षणिक वर्षा अखेरीस शिक्षकांवर कामाचा प्रचंड ताण असताना देखील प्रशासनाकडून बोगस शिधापत्रिका शोध मोहिमेच्या कामाचा अतिरिक्त ताण टाकण्यात आल्याने इंदापूर तालुक्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तहसीलदारांनी सदराचा आदेश त्वरित रद्द करावा अन्यथा स्वाभिमानी शिक्षक परिवार बोगस शिधापत्रिका शोधमोहीमेवर बहिष्कार टाकणार असल्याचे म्हटले आहे. सदर आशयाचे निवेदन आज तहसीलदारांसह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.

इंदापूर तालुक्यात सध्या बोगस शिधापत्रिका शोध मोहीम ३० एप्रिलपर्यंत राबविण्यात येणार असून, याकामी तहसीलदारांनी इंदापूर तालुक्यातील १९७ प्राथमिक शिक्षकांवर घरोघरी जाऊन अंत्योदय, बीपीएल, केसरी, शुभ्र, अन्नपूर्णा आणि अस्थापणा कार्ड अशा सर्व प्रकारच्या बोगस शिधापत्रिका शोधण्याची जबाबदारी टाकली आहे. मात्र शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस विद्यार्थ्यांचे ऑनलाईन तास, प्रशिक्षण, विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा, वार्षिक तपासणी अशा विविध कामांचा प्रचंड व्याप आणि ताण शिक्षकांवर असतानाही प्रशासनाने टाकलेल्या अतिरिक्त ताणामुळे शिक्षकांमध्ये प्रशासनाबाबत प्रचंड नाराजी आहे.

बोगस शिधापत्रिका शोध मोहिमेत अनेक महिला शिक्षीकांना गैरसोयीची ठिकाणे देण्यात आली असून, नागरिकांमध्ये मोहिमेबाबत अनेक संभ्रम असल्याने शिक्षकांवर नागरिकांचे विनाकारण रोष ओढवणार आहे. आतापर्यंत तीन शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, अनेक शिक्षक कोरोना बाधित झाल्याची बाबही प्रशासनाने लक्षात घेणे गरजेचे होते. तहसीलदारांनी सदरचा तुघलकी फर्मान रद्द करावा अन्यथा या तुघलकी फर्मानावर स्वाभिमानी शिक्षक परिवार बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन इंदापूरचे तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आहे. त्यामुळे आता रेशनकार्ड शिक्षक आणि प्रशासन वाद पेटवणार असल्याचे दिसत आहे. यावर आता प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे.

निवेदन देताना स्वाभिमानी शिक्षक परिवाराचे सुहास मोरे, संतोष गदादे, दत्तात्रय ठोंबरे, बालाजी कलवले, शशिकांत शेंडे, संतोष घोडके, रामदास पांडूळे, प्रशांत घुले, रामचंद्र शिंदे, उज्ज्वल कुमार सुतार, समीर मुलाणी, सुरेश घोळवे, दिनेश काळे असे विविध पदाधिकारी उपस्थित होते.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट