रेशन दुकानांसमोरच होणार हमीपत्राची होळी; बहुजन मुक्ती पार्टीच्या आंदोलनाचा उद्या पहिला टप्पा

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (२५ मार्च) : बोगस शिधापत्रिका शोधमोहिमे अंतर्गत शिधापत्रिका धारकांकडून भरून घेतले जाणारे हमीपत्र म्हणजे नागरिकांची शुद्ध फसवणूक असून ही प्रक्रिया तात्काळ न थांबवल्यास या प्रक्रियेविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आंदोलन करणार असून, या आंदोलनाचा पहिला टप्पा उद्या (२६ मार्च) सर्व रेशन दुकानांसमोर हमीपत्रांच्या होळीच्या स्वरूपात केला जाणार आहे. 

सध्या बोगस शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र या प्रक्रियेत शिधापत्रिका धारकांकडून भरून घेतले जाणारे हमीपत्र म्हणजे लोकांची शुद्ध फसवणूक असून, उज्वला योजनेंतर्गत गोर गरिबांना मोफत गॅस देणारे सरकारची आता गॅसच्या मोबदल्यात शिधापत्रिका रद्द करण्याची प्रक्रिया अनाकलनीय असली तरी, यामागे दारिद्र्यरेषेखाली जीवन व्यतिथ करणाऱ्या कोट्यावधी लोकांना उपाशी मारून त्यांचा नरसंहार करण्याचे फार मोठे षडयंत्र केंद्र सरकार आखत असल्याचे बहुजन मुक्ती पार्टीचे शहराध्यक्ष संतोष क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नागरिकांच्या हितार्थ आणि या अनाकलनीय प्रक्रियेविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आंदोलनाचे शस्त्र उपसणार असून आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात उद्या (२६ मार्च) रेशन दुकानांसमोर हमीपत्राची होळी करण्यात येणार आहे. तर २ एप्रिलच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व तहसील समोर आंदोलन केले जाणार आहे. सोबतच फॉर्म भरण्याआधी धान्य देण्यास नकार देण्याचे प्रांताधिकाऱ्यांनी कोणतेच आदेश स्वस्त धान्य दुकानांना दिले नसल्याने धान्य देण्यास नकार देणाऱ्या दुकानांविरोधात तक्रार देण्यास नागरिकांनी पुढे यावे असेही आवाहन बहुजन मुक्ती पार्टीकडून करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेले वरील आशयाचे निवेदन इंदापूरचे तहसीलदार यांना देताना, बहुजन मुक्ती पार्टीचे इंदापूर शहराध्यक्ष संतोष क्षिरसागर, संजय (डोनाल्ड) शिंदे, सुरज धाईंजे, रोहित ढावरे, संजय कांबळे, तसेच इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट