भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट

संपादकीय

२०१९ मध्ये अवघ्या दीड हजार मतांच्या फरकाने दत्तात्रय भरणे यांची आमदारकी वाचली होती. २०२४ मध्ये मात्र ही आमदारकी वाचवणे त्यांच्यासाठी तारेवरची कसरत ठरणार असेच एकंदरीत चित्र आहे. वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली उलथापालथ, रस्त्यांच्या कामात होणारे भ्रष्टाचाराचे आरोप, अनेक आरोपानंतरही भ्रष्ट ठेकेदारांवर कृपादृष्टी, प्रशासनावर नसलेला वचक, शरद पवार यांच्याशी दगा, पक्षात पडलेली उभी फूट, भाजपवर जातीवादाचे हजारो आरोप करूनही सत्तेसाठी भाजपसोबतच युती, परिणामी मतदारांमध्ये वाढलेली नाराजी, गमावलेली विश्वासहार्यता, कार्यकर्त्यांमधील संभ्रमावस्था, युवक, बेरोजगार, उद्योग, व्यवसाय, शेतकरी, शिक्षण यासाठी न'च्या घरात कामे, या आणि अशा अनेक कारणांमुळे भरणे आमदारकीची हॅट्रिक करतील याबाबत शंका उपस्थित होणं स्वाभाविक आहे. माणूस म्हणून चांगले असले तरी आमदार म्हणून भरणे कसे आहेत याचं लोकांनी निवडणूकपूर्व ऑडिट करणं, आमदारकीची समीकरणे बिघडवणाऱ्या बाबींचं भरणे यांनी आत्मपरीक्षण करणं, तर माध्यमांनी त्यांच्या चुकांवर बोट ठेवणं गरजेच आहे.

खरं तर तालुक्यातील रस्त्यांच्या कामांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची बोंब भरणेंच्या आमदारकीची समीकरणे बिघडवण्याचं मजबूत कारण ठरेल. मागील काही वर्षात शासनाने सर्वात जास्त विकास निधी इंदापूर तालुक्याला दिला. निश्चितच यामध्ये भरणेंना क्रेडिट दिलं पाहिजे. विकास कामांसाठीचा हा निधी अधिक प्रमाणात रस्त्यांवर खर्च करण्यात आला. परंतु रस्त्याच्या भ्रष्टयुक्त दर्जांमुळे विकास फक्त ठेकेदारांचाच झाला अशी टीका भरणेंवर त्यांचे राजकीय विरोधकच नव्हे, तर आता सामान्य लोकंही खुलेआम करू लागली आहेत. भ्रष्टाचारामुळे १५ वर्ष मुदतीचे अनेक रस्ते १५ दिवसांत, तर ३० वर्ष मुदतीचे रस्ते ३० दिवसांत मातीमोल झाले. इंदापूर शहरात सा.बां. विभागाच्या छत्रछायेखाली जगताप ठेकेदाराने बनवलेल्या ३० वर्ष मुदतीचा सिमेंटचा दर्जाहीन रस्ता ३० दिवसांतच खराब झाला. विशेष म्हणजे या रस्त्याची चौकशी लावतो असा दिलेला शब्दही भरणे सोयीस्करपणे विसरले. वेळ मारून नेहली त्यांनी बस. हाताने रस्ते उचकटत असल्याचे अनेक व्हिडिओही समोर आले. रस्ते उचकटण्यापेक्षा कोंबडी सोलणे अवघड अशा उपहासात्मक टीकाही झाल्या. विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची शंका उत्पन्न करणारी अशी अनेक उदाहरणे देता येतील. मात्र अनेक तक्रारी होऊनही ना कोणती चौकशी झाली, ना भ्रष्ट ठेकेदारांवर कारवाई झाली. का नाही झाली यासंबंधी तर्क वितर्क लावताना आरोपांचे बोट भरणेंकडे जाणे साहजिक आहे. त्यामुळे न भूतो न भविष्यती एवढा निधी आणि न भूतो न भविष्यती एवढे भ्रष्टाचाराचे आरोप हे समीकरण भरणेंना भविष्यात त्रासदायक ठरू शकते.

आमदारकीची समीकरणे बिघडवणारा आणखी एक मुद्दा म्हणजे मुस्लिमांमध्ये असलेली नाराजी. खरं तर २०१९ ला भरणेंना मुस्लिम मतांनी तारलं असं म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही. निकाल प्रभावित होईल एवढी मतसंख्या असूनही तालुक्यात आपण केवळ वापराची वस्तू बनून राहिल्याचे मुस्लिमांना आधीच वाटतं. शहर असो वा तालुका लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय प्रतिनिधीत्वही मुस्लिम समाजाला कधीच मिळालं नाही. त्यातच ९ वर्षांच्या आपल्या कार्यकाळात भरणे यांनी दर्गा, मस्जिद, कब्रस्तान यांना निधी देण्याची घोषणा करण्यापलीकडे आमच्यासाठी काहीच केले नाही अशी भावना आता तालुक्यातील मुस्लिमांमध्ये आहे. आपल्या आमदारकीच्या काळात, विशेषतः मागील ४ वर्षांच्या सत्ताकाळात भरणे यांनी मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत, रोजगाराबाबत, विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि शिष्यवृत्तीबाबत "ब्र" शब्द देखील काढला नाही, ना प्रतिनिधीत्व दिलं. याची खंत मुस्लिमांना जरूर आहे. २०१९ मध्ये निवडणूकपूर्व इंदापूर शहरात झालेल्या मुस्लिम मेळाव्यात उर्दू शाळेबाबत दिलेला शब्दही ते विसरले. याउलट ज्यांचं राजकारणच मुस्लिम द्वेषावर अवलंबून आहे अशा भाजपसोबतच त्यांनी तत्वांना, विचारांना मूठमाती देत आता संसार थाटला आहे. त्यामुळे भरणेंबद्दल मुस्लिम समाजामध्ये नाराजी असणे स्वाभाविक आहे.

भरणे यांच्या आमदारकीच्या हॅट्रिकची समीकरणे बिघडतील हे सांगण्यामागे एक महत्वाचं कारण म्हणजे, २०१९ मध्ये ज्यांच्या शेवटच्या सभेमुळे भरणे तरले होते ते शरद पवार यंदा भरणेंच्या बाजूने नसतील. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याने तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने आहेत. घर का भेदी लंका ढाये हा इतिहास नजरेआड करून चालणार नाही. दुसरं म्हणजे राष्ट्रवादीत जे घडलं ती काका पुतण्याची खेळी नाही हे गृहीत धरल्यास ज्याने गद्दारी केली किमान त्याला शरद पवार नडतील हे वेगळं सांगायची गरज नाही. आगामी विधानसभेला ते उमेदवार देतील, अथवा दुश्मन का दुश्मन दोस्त होता है या नियमांअन्वये वागतील. काहीही करो ! याचा अधिक तोटा भरणे यांनाच होईल. भरणेंपासून दूर चाललेला युवा वर्गही भरणेंसाठी अडचणीचा ठरणार आहे. कारण कोणतेही असो, परंतु भरणेंवर नाराज असलेला तालुक्यातील युवक वर्ग आता सुप्रिया सुळेंच्या मागे उघडपणे सक्रिय होऊ लागला आहे. आजवर भरणेंसोबत दिसणारा युवक सुळेंना आपल्या घरी चहापानासाठी आमंत्रित करून आपण मरते दम तक शरद पवारांसोबतच असल्याचा संदेश भरणे यांना देऊ लागला आहे. काही मतांवर प्रभाव टाकतील असे नेते २०१९ नंतर पाटील यांना सोडून भरणेंकडे गेले होते. उद्या पुनः ते पाटील यांच्याकडे जाणार नाहीत, अथवा शरद पवार गटाकडे वळणार नाहीत याचीही काय शास्वती? मागील ९ वर्षात शालेय क्षेत्रात उदासीन कामगिरी, युवक, बेरोजगारांसाठी स्टॅटर्जीचा अभाव, शेतकऱ्यांना ऊस बिलाच्या शापातून सोडवण्याची संधीकडे फिरवलेली पाठ'ही आमदारकीची समीकरणे बिघडवण्यास कारणीभूत ठरेल.

शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हर्षवर्धन पाटील यांची भूमिका. खरं तर २०१९ मध्येच हर्षवर्धन पाटील विजयी झाले असते. मात्र केवळ भाजपमध्ये गेल्याने त्यांची हिट विकेट पडली. नेमकी हीच हिट विकेट भरणे यांच्या पथ्यावर पडली होती. पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली असती तर भरणे आज माजी असते असं अनेकांचं मत आहे. असो ! मात्र महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती जैसे थे राहिल्यास हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणूक लढवतील, भरणेंच्या भाषेत बोलायचंच झालं तर घरी बसणे, अथवा अपक्ष लढणे हे दोनच पर्याय त्यांच्यापाशी असतील अशी भाकितं आज सामान्यांच्याही तोंडी आहेत. कोणत्याही कारणास्तव पाटील अपक्ष लढलेच तर त्यांच्या ह्या गुगलीवर भरणे यांना आपली विकेट वाचवणे अवघड होईल. कारण जवळपास लाखाच्या घरात हक्काचं मतदान असलेले पाटील केवळ भाजपमध्ये गेल्याने त्यांच्यापासून दूर गेलेली मते पुनः त्यांच्याकडे वळतील. त्यामुळे दीड हजारांची पिछाडी भरून काढणे पाटील यांच्यासाठी हाताचा मळ असेल याची जाणीव खुद्द भरणे यांनाही असावी. पाटील निर्णय घेतील न घेतील. मात्र पाटील यांनी दिशा बदलली की त्यांची दशाही बदलेल अशी चर्चा जोरात आहे. किंतु परंतु शेतकऱ्यांचे हाल करणारा ऊस बिलाचा गंभीर प्रश्न पाटील यांची दशा ॲस इट इज ठेऊ शकतो, हे देखील पाटील यांना समजणं गरजेचं, तर सक्षम पर्याय मिळाला तर आम्हीच तालुक्याचे गॉड फादर आहोत हा गैरसमजही जनता यावेळी  दूर करू शकते यावर दोघांनी आत्मचिंतन करणे आवश्यक आहे.

बरं ! ह्या जर तरच्या गोष्टी, भूतकाळातील घटनांवरुन केलेलं विश्लेषण आहे. वेंगा बाबाची भविष्यवाणी नाही. सध्या राजकीय समीकरणांएवढी अनिश्चितता कुठेच राहिलेली नाही. ना कोणती विचारधारा बाकी, ना तत्वनिष्ठता उरली. शेवटी जनता जनार्दन आहे. बघुयात ! ती कोणाची समीकरणे बिघडवते, परिस्थिती जैसे थे ठेवते, आजीला माजी आणि माजीला आजी करते, का सक्षम पर्याय मिळाल्यास तिसऱ्यालाच आमदार बनवते.

टिप्पण्या

  1. योग्य आणि सटीक विश्लेषण. मर्मावर बोट.

    उत्तर द्याहटवा
  2. काळे चष्मे काढले तरं बरेच कामे दिसतील.

    उत्तर द्याहटवा
  3. जिथे एका पक्षा विरोधी 27 पक्ष एकत्र येतात ह्याचा अर्थ आहे राजाचे काम चांगले चालू आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. रस्त्यांच्या कामाची चौकशी झाली पाहिजे कोट्यावधींचा घोटाळा बाहेर येईल

    उत्तर द्याहटवा
  5. लिहिलेला शब्द ना शब्द खरा आहे. जनतेने तिसरा पर्याय आता शोधला पाहिजे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७