अनैतिक संबंध प्रकरण - जखमी पतीचा उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (२५ ऑक्टोबर) :- अनैतिक संबंधांना अडचण ठरणाऱ्या पतीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार इंदापूर शहरात सोमवारी (२३ ऑक्टोबर) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडला होता. या प्रकारात धारदार हत्याराने भोकसल्याने जबर जखमी झालेले ईश्वर भीमराव कांबळे (रा. टेंभुर्णी नाका, इंदापूर) यांच्यावर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र बुधवारी (२५ ऑक्टोबर) रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर आज सायंकाळी त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.
ही घटना घडल्यानंतर मृताचे वडील भीमराव सुदाम कांबळे (रा. आंबेगाव कुबेर प्रॉपर्टी, ता हवेली, जि. पुणे) यांनी मंगळवारी (२४ ऑक्टोबर) सूनेसह अन्य दोघांच्या विरोधात फिर्याद दिली होती. त्या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलिसांनी मृताची पत्नी रूपाली ईश्वर कांबळे, तिचा प्रियकर पिनेश उर्फ मयूर महेंद्र धाईंजे (दोघे रा. टेंभुर्णी नाका) आणि त्याचा मित्र नवनाथ शेंडे (रा. अंबिकानगर, इंदापूर) या तिघांविरोधात भा.द.वि. ३०७, ४५२, ३४ अशा विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
वर नमूद तारीख आणि वेळी पिनेश याने ईश्वर कांबळे यांच्या राहत्या घरात जाऊन त्यांच्या पोटात धारदार हत्याराने वार केला होता. परिणामी ईश्वर कांबळे जबर जखमी झाले होते. या घटनेत रुपाली कांबळे याही जखमी झाल्या होत्या. मात्र त्यांनी स्वतःच आपल्या हातावर वार करून घेतल्याची चर्चा शहरात आहे. त्यांच्यावर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अन्य दोघे आरोपी इंदापूर पोलिसांच्या कस्टडीत आहेत. त्यांना इंदापूर न्यायालयाने ३० ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेतील सत्य नी तथ्य इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार तपासत आहेत.
धाईंजे याच्यावर अनेक गुन्हे; मोक्का कायद्यांतर्गतही झाली होती कारवाई
२०११ ते २०२१ या १० वर्षांच्या कालावधीत दरोडा, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अवैध सावकारी, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी, मारामारी अशा अनेक गुन्ह्यांची नोंद असलेल्या इंदापूर शहरातील गणेश पवार टोळीवर जून २०२१ मध्ये मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. यामध्ये पिनेश उर्फ मयूर महेंद्र धाईंजे याच्यासह अन्य चार जणांचा समावेश होता. याप्रकरणी आरोपींना न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर झाल्याने तो बाहेर होता. तदनंतर मागील दोन वर्षात पिनेश याच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा