इंदापूर पोलीस ठाण्यात ५ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल; राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीचाही होता समावेश
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (१६ ऑक्टोबर) :- जनशक्ती संघटनेचा संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे याच्यासह अन्य चार जणांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात शनिवारी (१४ ऑक्टोबर) खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर एन.पी.इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यासह, कंपनीची बदनामी आणि कंपनीच्या मालमत्तेचे नुकसान करण्याची धमकी देऊन तब्बल २५ लाख रु. खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे. या संदर्भात कंपनीचे पर्यवेक्षक (सुपरवाईझर) सतीश किसन भुकन (रा. मार्केटयार्ड पुणे, सध्या रा. बेडशिंगे, ता. इंदापूर) यांच्या फिर्यादीवरून, अतुल खुपसे, बालाजी शिरसकर (दोघेही रा. उपळवटे, ता. माढा जि. सोलापुर), विजय देशमुख, अविनाश देशमुख (दोघेही रा. टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) यांच्यासह राजकीय पार्श्वभूमी असलेल्या इंदापूर तालुक्यातील एकावर भा.द.वि. १८६०, कलम ३८४, ३८५, ३८७ सह संबंधित अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अतुल खुपसे हा आरोपी गतमहिन्यात तालुक्यातील गौणखनीज उत्खननाच्या संदर्भात आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावरील आरोपामुळे चर्चेत आला होता.
फिर्यादी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एन.पी.इन्फ्रा या कंपनीकडून रस्त्यांशी संबंधित विविध शासकीय कामे केली जातात. सध्या कंपनीकडून इंदापूर तालुक्यातील पालखी मार्गाच्या कामासह वेगवेगळ्या तालुका आणि जिल्ह्यांमध्ये रस्त्याची कामे सुरू आहेत. संबंधित भागांमध्ये आपल्या संघटनेची दहशत असल्याचे सांगत आरोपी अतुल खुपसे याने विविध प्रकारची धमकी देऊन वर्षाकाठी प्रोटेक्शन मनी म्हणून ५० लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. या धमकीला न जुमानल्याने कंपनीवर दबाव आणण्यासाठी त्याने आपल्या संघटनेमार्फत इंदापूर येथे कंपनी विरोधात मोर्चा काढला. संबंधित मंत्रालय व शासकीय कार्यालयांमध्ये खोट्या तक्रारीही केल्या. परिणामी कंपनीची बदनामी झाली व शासकीय बिले मिळण्यासाठी अडचणीही निर्माण झाल्या.
सप्टेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान आरोपींना कंपनीने २५ लाख रु. खंडणी दिली असून, यामध्ये अतुल खुपसे याने चाकूच्या धाकाने हडपसर ब्रीजजवळ १० लाख रू. खंडणी वसूल केल्याचे, तसेच १५ लाख रु. आर.टी.जी.एस. द्वारे आरोपींच्या विविध बँकेतील खात्यावर जमा केल्याचे फिर्यादी यांनी म्हटले आहे. प्रकरण मिटवण्यासाठी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या आरोपीने आपली इतर आरोपींसह १६ सप्टेंबर २०२३ रोजी पुण्यामध्ये मीटिंग घडवून आणल्याचे, तथा प्रकरण मिटवून घ्या अन्यथा सगळ्यांना त्रास होईल असेही त्याने या मीटिंगमध्ये म्हटल्याचे सतीश भुकन यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
विशेष म्हणजे राजकीय वलय असलेल्या या व्यक्तीवर काही दिवसांपूर्वीच इंदापूर पोलीस ठाण्यात फसवणुक आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्याला न्यायालयाकडून अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. परंतु शनिवारी दाखल झालेल्या वरील खंडणीच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भल्या सकाळी खुद्द फिर्यादीनेच त्याच्यावरील आरोप मागे घेतल्याचे सूत्रांकडून समजते. सूत्रांच्या माहितीमध्ये तथ्य आहे हे गृहीत धरल्यास काही प्रश्न याठिकाणी उपस्थित होणे अपरिहार्य आहे.... जर त्याचा या प्रकरणात सहभाग नव्हता तर त्याचे नाव या प्रकरणात का गोवण्यात आले? किंतु परंतु सहभाग होताच तर फिर्यादीकडून एवढ्या तातडीने आरोप मागे घेण्याचे कारण काय? या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा