दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अशुभ घटना - दसऱ्याची खरेदी करून घरी निघालेल्या दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडले; दूर्गेश्वरी हॉटेल नजीकची घटना
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (२४ ऑक्टोबर) :- दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर एक अशुभ घटना आज सकाळी इंदापूर नजीक घडली. दसऱ्याची खरेदी करून घरी निघालेल्या दशरथ मारुती चोरमले (अंदाजे वय ५० वर्ष, रा. काळके वस्ती, गलांडवाडी नं. १, ता. इंदापूर) या दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकने चिरडले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. दूध विक्री करून, तथा दसऱ्यासाठी झेंडूची फुले आणि इतर साहित्य खरेदी करून ते घरी निघाले असता पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने (एमएच ३२ एजे ९२७३) त्यांना चिरडले. ही दुर्दैवी घटना आज (२४ ऑक्टोबर) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास इंदापूरनजीक पुणे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या दुर्गेश्वरी हॉटेल आणि चैतन्य हॉटेलच्या दरम्यान घडली. ऐन दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
हा अपघात एवढा भयानक होता की, दुचाकीस्वाराच्या मेंदूसह शरीराचे अवयव घटनास्थळी अक्षरशः विखुरले होते. या घटनेनंतर ट्रक (एमएच ३२ एजे ९२७३) चालक पसार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दशरथ चोरमले नेहमीप्रमाणे सकाळी दूध विक्री करण्यासाठी इंदापूर शहरात आले होते. यावेळी दूध विक्री करून, तथा दसरा साजरा करण्यासाठी फुले व आवश्यक वस्तू घेऊन ते आपल्या दुचाकीवरून (एमएच ४२ सी ५६०४) घरी निघाले होते. यावेळी पुण्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकने त्यांना चिरडले. अपघातानंतर खरेदी केलेल्या वस्तूही रस्त्यावर विखुरल्या होत्या. या घटनेनंतर घटनास्थळी १५०-२०० नागरिक जमा झाले होते. यावेळी संतप्त झालेल्या जमावाने ट्रक पेटवून दिला.
हे देखील वाचा - भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संधी हूकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट
इंदापूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तदनंतर इंदापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने काही वेळातच ही आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत ट्रकचे चांगलेच नुकसान झाले. ही घटना समजताच रुग्णवाहिका चालक नितीन खिल्लारे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर विखुरलेले मृताच्या शरीराचे अवयव आपणच गोळा करून एकत्र केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान पेटवलेला ट्रक विझवण्याचा प्रयत्न करत असताना इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन नरळे यांना किरकोळ भाजल्याचे समजते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा