खळबळजनक - अनैतिक संबंधास अडचण ठरणाऱ्या पतीचा खून करण्याचा प्रयत्न; पत्नी, तिचा प्रियकर आणि प्रियकराच्या मित्रावर गुन्हा दाखल
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (२४ ऑक्टोबर) :- अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच आपल्या प्रियकर आणि त्याच्या मित्रासोबत पतीचा धारदार हत्याराने खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना इंदापूर शहरात घडली. सोमवारी (२३ ऑक्टोबर) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ईश्वर भीमराव कांबळे (रा. टेंभुर्णी नाका, इंदापूर) यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ते अत्यवस्थ अवस्थेत आहेत. या संदर्भात भीमराव सुदाम कांबळे (रा. आंबेगाव कुबेर प्रॉपर्टी, ता हवेली, जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरुन पत्नी रूपाली ईश्वर कांबळे आणि तिचा प्रियकर पिनेश उर्फ मयूर महेंद्र धाईजे (दोघे रा. टेंभुर्णी नाका) आणि प्रियकराचा मित्र नवनाथ शेंडे (रा. अंबिकानगर, इंदापूर) यांच्या विरोधात भा.द.वि. ३०७, ४५२ कलमाअंतर्गत इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा मुलगा व या घटनेतील जखमी ईश्वर भीमराव कांबळे यांची पत्नी रुपाली ईश्वर कांबळे आणि पिनेश उर्फ मयूर महेंद्र धाईजे यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. ही बाब पती ईश्वर कांबळे यांना माहीत झाली होती. परिणामी पतीकडून अनैतिक संबंधांना होणारा विरोध संपवण्यासाठी रुपाली कांबळे हिने पिनेश उर्फ मयूर महेंद्र धाईजे आणि त्याचा मित्र नवनाथ शेंडे यांच्यासह संगनमत करून पतीचा काटा काढण्याचा प्लॅन केला. सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ईश्वर कांबळे यांच्या राहत्या घरात जाऊन पिनेश याने ईश्वर कांबळे यांच्याशी वाद घातला. यावेळी पिनेश याने ईश्वर कांबळे यांच्या पोटात धारदार हत्याराने वार केले.
हे देखील वाचा - दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अशुभ घटना; दुर्गेश्वरी हॉटेल नजीक एकाला ट्रकने चिरडले
या घटनेत ईश्वर कांबळे जबर जखमी झाले आहेत. या घटनेत रुपाली कांबळे याही जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पती ईश्वर कांबळे यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेतील अन्य दोघे आरोपी सध्या इंदापूर पोलिसांच्या कस्टडीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा