संत तुकोबांच्या पादुकांचे दर्शनही हुकले सोन्याची साखळीही चोरीला

रयत शिक्षण संस्थेच्या मैदानावर घडला प्रकार; इंदापूरमधील प्रसिद्ध हॉटेल मालकाचा १ लाख ६ हजारांची सोनसाखळी चोरीला

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (२७ जून) :- संत तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या एका भाविकाच्या दोन तोळ्यांच्या सोन्याच्या साखळीवर चोरट्याने हात साफ केला. या साखळीची किंमत १ लाख ६ हजार रुपयांच्या आसपास असून, इंदापूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या मैदानावर गुरुवारी (२२ जून) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या संदर्भात डोंगराई सर्कल येथील शिवराज हॉटेलचे मालक समीर हनुमंत सुर्यवंशी (रा. सातपुतेवस्ती, इंदापूर ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संत तुकाराम महाराजांची पालखी गुरुवारी (२२ जून) इंदापूर मुक्कामी आली होती. सालाबादप्रमाणे रयत शिक्षण संस्थेच्या मैदानावर दुपारी बारा एकच्या दरम्यान गोल रिंगण पार पडले होते. यावेळी तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी फिर्यादी त्याठिकाणी गेले होते. परंतु आरतीनंतर भाविकांच्या अफाट गर्दीमुळे झालेल्या ढकलाढकलीच्या परिणामी ते पालखीपासून १०-१५ फूट लांब ढकलले गेले. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्याने आपली चेन चोरल्याचे फिर्यादी यांनी म्हटले आहे.

गर्दीमुळे दर्शन न घेताच ते सदर ठिकाणाहून बाहेर पडले होते. चेन गळ्यात नसल्याची बाब काही वेळाने लक्षात आल्याने त्यांनी पुन्हा गर्दीत जाऊन साखळीचा शोध घेतला मात्र चोर आणि साखळी दोन्ही सापडले नाहीत. या घटनेव्यतिरिक्त अजूनही काही घटना पालखीदरम्यान घडल्याची चर्चा शहरात आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट