तो मोदींच्या छत्रछायेखाली आहे म्हणून; होय तो भाजपचा खासदार आहे म्हणून...

 

संपादकीय...

भारतीय कुस्ती संघाचा (रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया) अध्यक्ष आणि भाजपचा खासदार ब्रिजभूषण सिंह याच्या विरोधात देशभरात संताप उसळत आहे. कारणही गंभीर आहे. महिला कुस्तीपटुंनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केलाय त्याच्यावर. खेळात मदत करण्याच्या बदल्यात भाजपच्या या खासदाराने शारीरिक संबंधाची मागणी केली असा उल्लेख पोलीस तक्रारीत असल्याचं इंडियन एक्स्प्रेसने म्हटलं आहे. हिंमत दाखवून तक्रार करणाऱ्यांत अल्पवयीन कुस्तीपटुही आहेत. ब्रिजभूषण याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्याच्यावर लैंगिक शोषण, हत्या, हत्येचा प्रयत्न, दाऊद इब्राहिमच्या साथीदारांना शरण देणे असे गुन्हेगारी स्वरूपाचे ४० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आश्चर्य ! जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीत महिला पैलवानांच्या प्रकरणात गुन्हा दाखल करा म्हणून सुप्रीम कोर्टाला सांगावं लागलं. मात्र तो अद्यापही मोकाट आहे. कारण स्पष्ट आहे. तो जगातल्या सर्वात मोठ्या पार्टीचा खासदार आहे. होय तो मोदींच्या पार्टीचा, तो भाजपचा खासदार आहे म्हणूनच.

पिडीत महिला कुस्तीपटुंचे आंदोलन उखडून टाकण्याचा घटनाक्रमही अस्वस्थ करणारा आणि महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. ब्रिजभूषणला जेलमध्ये टाकण्याऐवजी साक्षी मलिक, बजरंग पुनिया या देशासाठी ऑलिम्पिकपर्यंत धडक मारून आलेल्या, आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांमध्ये देशाला पहिलंवहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या विनेश फोगाटसारख्या खेळाडूंना रस्त्यावरून फरफटत पोलीस व्हॅनमध्ये कोंबलं गेलं. दुर्दैवी आणि तेवढंच संतापजनक आहे हे. मोदींना चांगलं माहीत आहे ते दंगेधोपे करणारे, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे गुंड, चरस गांजाचे तस्कर नाहीत, की समाजकंटकही नाहीत. जगभरात देशाचे नाव उंचावणारे खेळाडू आहेत ते. पदक जिंकल्यानंतर मोदींनीच यांना आपल्या परिवारातील सदस्य म्हटलं होतं. मात्र देशाचं दुर्दैव ! मन की बात करणाऱ्या मोदींना परिवाराच्या, देशावासियांच्या मनातलं काहीच कळत नाही.

हल्ली न्यायाची, सत्य, असत्याची परिमाणं बदलत आहेत. बलात्कारीही संस्कारी असतात हे भाजपच्या नेत्यांकडूनच देशाला कळालं. मोदींच्या गुजरातमध्ये बलात्काऱ्यांचा सत्कारही झाला. यावरही मोदी गप्प राहिले. मोदींच्याच सांगण्यावरून हे झालं असावं? अनेकवेळा मोदींवर गुजरात दंग्याचे आरोप झाले. त्यामुळे शंका नाही का येणार? मागील काही वर्षात ३३ हजार महिला इसिस या आतंकी संघटनेत सामिल झाल्या. हे देशाला चित्रपटातून कळालं. याला खरं मानलं तर गुप्तचर संघटना, पोलीस यंत्रणा काय करत होत्या? मोदींना का कसं हे माहीत नव्हतं? काय उपाययोजना केल्या त्यांनी? मोदी काळात (कलयुगात) देशातील महिला कधी न एवढ्या असुरक्षित आहेत हे का आणि कसं नाकारायचं? NCRB ची आकडेवारी कशी खोटी ठरवायची? देशात दरवर्षी साडेपाच लाखांच्यावर महिला हिंसाचाराच्या शिकार होत आहेत. बलात्काराचा आकडाही ४० हजारांच्यावर आहे. स्त्री भ्रूणहत्या लाखोंच्या घरात. ही सर्व आकडेवारी फक्त नोंदवलेली. त्यामुळे "बेटी बचाओ बेटी पढाओ" टेंपोवर लिहून आणि भाषणबाजीने बेटी वाचणार का? वाचवायच्याच नाहीत यांना? तसं असतं तर पैलवानांना आंदोलन करावं लागलं नसतं. छोट्या छोट्या गोष्टीवर व्यक्त होणारे मोदी महिला कुस्तीपटुंना शरीरसुखाची मागणी करणाऱ्या खासदाराला निलंबित करून "बेटी बचाओ पेक्षा मोठं काहीच नाही" हे का दाखवून देत नाहीत? मात्र ते असं करतील? आरोपी भाजपचा खासदार आहे म्हणून शंका येते. सर्व पाप भाजपमध्ये जाऊनच स्वच्छ होतात ना? मोदींचे नारे, वादे, इरादे फसवे आहेत, जुमला आहेत हे आता येड्यांनाही पटू लागलंय. 

खेळाडू म्हणून भविष्य घडवू पाहणाऱ्या भारतातील कैक मुलींचं प्रशिक्षण सगळ्यात आधी त्यांच्या घरूनच बंद होतं. ही बाजू पाहता महिला पैलवानांची पदकापर्यंतची धडक आणि त्यांच्या आंदोलनाचे गांभीर्य यांना का समजत नसावे? ब्रिजभूषण खेळाडूंच्या पदकांना १२-१५ रुपयांचे पदक म्हणतो. रक्ताचं पाणी करून देशासाठी मिळवलेल्या पदकांची किंमत या कवडीमोल खासदाराला कशी कळणार? टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने ब्रिजभूषण याच्या मुलाच्या सुसाईड नोटमधील एक बाब वायरल होतेय, "तुम एक अच्छे पिता नहीं हो। मुझे मेरे बहन की भी चिंता हो रही है, जब की वह अब बड़ी हो रही है।" खरं तर मोदींनी त्याला पक्षातून निलंबित करण्याचे आदेश द्यायला हवे होते. मात्र देशाचं दुर्दैव तो आजही मोकाट आहे. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात बसतोय. का वाचवताहेत मोदीजी त्याला? कुठं आहे भाजपचे महिला मंडळ? कुस्तीची सर्वोच्च आंतरराष्ट्रीय संस्था युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) भारतीय कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ उतरली आहे. भारतीय कुस्ती संघटनेला निलंबित करण्याचा इशाराही दिला आहे. मात्र देशाचे प्रधानमंत्री अजूनही गप्प आहेत. 

आता भाजप मोदी @9 मोहीम राबवत आहे. मोदींचं महिमा मंडण सुरू आहे. ते विश्वव्यापी नेतृत्व असल्याचं भाजप नेते पटवून सांगत आहेत. मोठं आणि वारंवार खोटं बोललं की ते लोकांना पटतं. मात्र कसं पटवून घ्यायचं त्या महिला कुस्तीपटुंनी? पुलवामा हल्ल्याची चौकशी कधी होणार? महागाई, बेरोजगारी, वाढते द्वेषपूर्ण वातावरण, धार्मिक तुष्टीकरण, असुरक्षित महिला, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या,  दडपशाही या आणि अशा हजारो समस्यांवर भाजप नेते कधी तोंड उघडणार? महिला पैलवानांच्या आंदोलनावर भाजप नेते कधी बोलणार? कसं बोलतील? कारण तो मोदींच्या छत्रछायेखाली आहे. जगातल्या सर्वात मोठ्या पार्टीचा तो खासदार आहे. होय तो भाजपचा खासदार आहे. तुम्ही काहीही करा तुम्ही मोदींच्या छत्रछायेखाली आहात. "पेहेलवान बेटियां पहलवानी छोड देगी. सरकारने अगर पहल नहीं की तो जनताने जैसे अंग्रजों को भगाया था वैसेही इस सरकार को भी भगा देगी" हे महावीर फोगाट यांचं वाक्य मला महत्वाचं आणि परिस्थितीसापेक्ष वाटतं. लोकांनी चिंतन करावं देश कुठे आणि कोणाच्या मागे चाललाय...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट