डांबर वर खाली खडी सांगा लोकहो ! बोलायचं कुणी?
रस्त्याची डागडुजीच वारकऱ्यांना ठरणार त्रासदायक; इंदापूर प्रशासनाच्या गलथान कारभाराची पुन्हा प्रचिती
मुत्सद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (८ जून) :- संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २२ जून रोजी इंदापूर शहरात आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांच्या डागडुजीचे काम संबंधित प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र ही डागडुजीच वारकऱ्यांसाठी जास्त त्रासदायक ठरणार आहे. सोमवारी (५ जून) नगरपरिषद प्रशासनाकडून इंद्रेश्वर मंदिरासमोरच्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र खड्डे न बुजवता केवळ डांबर आणि खडीचा सडा रस्त्यावर मारण्यात आला. संबंधित ठेकेदाराने खडी आणि डांबराचा मेळ न घातल्याने रस्त्याची अवस्था "असून अडचण, नसून खोळंबा" अशी झाली आहे.
उन्हामुळे रस्त्यावरील डांबर पूर्ण वितळत असून, नागरिकांना रस्त्यावरून चालणेही अशक्य होत आहे. डांबर नागरिकांच्या चपलांना आणि वाहनांच्या चाकांना चिटकत असल्याने नागरिक संबंधितांना शिव्या श्राप देऊनच पुढे जात आहेत. त्यातच आता २२ जून रोजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखों वारकरी इंदापूर शहरात मुक्कामी येणार आहेत. आधीच इंदापूर शहर आणि तालुक्यातील भ्रष्टाचारयुक्त रस्त्यांची जगभर चर्चा आहे. त्यातच पालखीपूर्व रस्त्यांच्या निकृष्ट डागडुजीमुळे संबंधित प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
वारंवार तक्रारी करूनही प्रशासन बोध घ्यायला तयार नाही. सगळं राम भरोसे चाललं आहे. परिणामी भ्रष्टाचारयुक्त विकासाची प्रचिती नागरिकांना येत असून, आजी माजी लोकप्रतिनिधींचे विकास कामांवरून होणारे वाद, लागणारे फ्लॅक्स, बातम्या आता लोकांना नकोशा झाल्या आहेत. त्यामुळे "डांबर वर खाली खडी, सांगा लोकहो ! बोलायचं कुणी?" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाचा तडाखा आणि रस्त्याची सद्यस्थिती पालखीपर्यंत कायम राहिल्यास वारकऱ्यांना त्रास होणार हे नक्की. असं झाल्यास इंदापूरच्या ना लायक प्रशासनाला, अधिकाऱ्यांना, ठेकेदारांना पांडुरंग माफ करेल का? असा सवाल त्यांनी स्वत:लाच विचारणं गरजेचं आहे.
...त्यालाच पडलेले खड्डे पुन्हा बुजवण्याचा हा खटाटोप
नेहरू चौक ते लहुजी चौकापर्यंतच्या नियमबाह्य पद्धतीने चाललेल्या रस्त्याच्या कामाला नागरिकांनी विरोध केला होता. परिणामी संबंधित काम दीड ते दोन वर्ष अर्धवट अवस्थेत होते. मागील वर्षी पालखीच्या पार्श्वभूमीवरच घाईगडबडीत रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र तेही निकृष्ट दर्जाचे व अर्धवट. त्यालाच पडलेले खड्डे बुजवण्याचा वरील खटाटोप. चेंबर आणि रस्त्याची उंची कुठेच मेळ खाईना. जनतेचा पैसा मातीत चाललाय. सगळा भोंगळ कारभार. मात्र काय करणार जळतं घर भाड्याने घ्यायची सवय इंदापूरकरांना लागली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा