अदृश्य चेटकीणीचा हात पुन्हा वळवळला; इंदापूर बस स्थानकात दोन महिलांच्या दागिन्यांवर हात साफ
बस स्थानकातील चोऱ्या रोखण्यात पोलीस प्रशासन हतबल? एसटी प्रशासनाने प्रवाशांना नुकसान भरपाई द्यावी...
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (११ जून) - इंदापूर बस स्थानकातील चोऱ्यांचे सत्र थांबायला तयार नसून, चोऱ्या रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याने या चोऱ्यांमागे अदृश्य चेटकीणीचा हात आहे का? असा उपहासात्मक सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. बुधवारी (७ जून) दुपारी पाऊणे तीन ते तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्याने दोन महिला प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला. या संदर्भात आशा सुरेंद्र निकम (रा. भाटनिमगाव ता. इंदापूर, जि. पुणे) या ६७ वर्षीय वृद्धेने शुक्रवारी (९ जून) इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
बुधवारी फिर्यादी आपल्या मुलासह बार्शीला निघाल्या होत्या. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ८ ग्रॅम सोन्याचे मनी असलेली तब्बल ३० हजार रू. किंमतीची माळ लंपास केली. दरम्यान आपली माळ शोधण्यासाठी बसच्या खाली उतरलेल्या फिर्यादी यांना अमृता किरण जाधव (रा. सुगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी आपल्यासोबतही असाच प्रकार घडल्याचे सांगितले. अमृता जाधव यांच्या गळ्यातील गंठण आणि कानातील सोन्याची फुले असे एकूण ५० हजार रु. किंमतीचे दागिनेही चोरट्याने लंपास केले. एकाचवेळी घडलेल्या या दोन्ही घटनांत एकूण ८० हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला.
मागे अशाच एका घटनेतील फिर्यादीने अनोळख्या महिलेवर संशय व्यक्त केला होता. वारंवार अशा घटना होत असतानाही पोलीस प्रशासन या घटना रोखण्यात पूर्णपणे हतबल ठरत असल्याचे दिसत आहे. परंतु पोलीस प्रशासन या घटनांतून बोध घ्यायला तयार नाही. एसटी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसस्थानकात पोलीस मदत केंद्र आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून त्याचा उपयोग एसटी कर्मचाऱ्यांच्या आरामासाठी होत आहे. ही बाब अनेकवेळा, अनेकांनी वेगवेगळ्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र पोलीस प्रशासन याला गांभीर्याने घ्यायला तयार नाही. त्यामुळे परिस्थिती अद्यापही जैसे थे'च आहे.
एसटी प्रशासनाने प्रवाशांना नुकसानीची भरपाई द्यावी...
मागील काही महिन्यात घडलेल्या अनेक घटनांमध्ये महिला प्रवाशांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. प्रवाशांना हर पद्धतीची सुरक्षा देणे ही एसटी प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र इंदापूरचे एसटी प्रशासन संबंधित विषयावर प्रवाशांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरले आहे. बसस्थानकात अथवा प्रवासादरम्यान एसटीमध्ये प्रवाशांच्या मालमत्तेची चोरी झाल्यास प्रशासनाने याची जबाबदारी घेत प्रवाशांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. अशा घटनांमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून, खाजगी वाहनांतून प्रवास करण्यास प्रवासी प्राधान्य देत आहेत. एसटी प्रशासन कितीही बोंबा मारत असले तरी, याच्याच परिणामी खाजगी वाहने बसस्थानकाच्या आत येऊन बिनधास्तपणे प्रवाशी वाहतूक करताना दिसत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा