इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची दमदार कामगिरी; दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

७ लाख रु. किमतीच्या एकूण २१ दुचाकी हस्तगत; १८ गुन्ह्यांचा पर्दाफाश

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (२१ जून) :- इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून चोरीच्या २१ दुचाकी हस्तगत करत गुन्हे शोध पथकाने इंदापूर शहरातील विनोद महादेव पवार (रा. सरस्वतीनगर) या २४ वर्षीय युवकासह, अतुल मारूती काळे (वय १९ वर्षे, रा. निमगाव, ता. माढा, जि. सोलापूर) आणि योगेश मच्छिंद्र सुरवसे (वय ३२ वर्षे, रा. बार्डी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) या दोघांना अटक केली आहे. पैकी एक आणि दोन नंबरचे आरोपी दुचाकी चोरून आरोपी नंबर तीन'ला विक्री करत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

या तिघा आरोपींकडून पोलिसांनी पल्सर, युनिकॉर्न, शाईन आणि एच.एफ. डिलक्स अशा ७ लाख रु. किमतीच्या एकूण २१ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे एक दोन नव्हे तब्बल १८ गुन्हे उघडकीस आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यामध्ये इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरीच्या १५, तर कुर्डुवाडी, टेंभूर्णी आणि फलटण हद्दीतील प्रत्येकी १ गुन्ह्याचा समावेश आहे. इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या दुचाकी चोऱ्यांमुळे पोलीस प्रशासनाच्या चिंता वाढवल्या होत्या. परिणामी वरिष्ठांच्या आदेशान्वये इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अभिलेखावरील आरोपी, तसेच विविध ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासत संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

विनोद महादेव पवार आणि अतुल मारुती काळे हे दोघे आरोपी दुचाकी चोरून योगेश सुरवसे याला विकत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तिघेही आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असून, अजूनही गुन्हे उघडकीस येतील अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, सहायक फौजदार प्रकाश माने, ज्ञानेश्वर जाधव, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस कॉन्टेबल नंदू जाधव, गजानन वानोळे आणि होमगार्ड लखन झगडे यांनी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट