हजारो चित्रबलाक पक्षांची इंदापूरमध्ये हत्या? इंदापूर नगरपरिषदेचे बेजबाबदार अधिकारी जबाबदार? नागरिक, पक्षी प्रेमींमध्ये संतापाची लाट

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

जुन्या तहसील कचेरीतील, तथा मालोजीराजेंच्या ऐतिहासिक गढीवरील मुळ्या कमकुवत झाल्याने धोकादायक  बनलेल्या चिंचेच्या झाडासंदर्भात योग्य पद्धतीने उपाययोजना करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. मात्र उपाययोजनांच्या नावाखाली इंदापूर नगरपरिषदेने नियमबाह्य व बेजबाबदार पद्धतीने ऐतिहासिक झाड आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जमीनदोस्त केले. परिणामी झाडावर आश्रित हजारो चित्रबलाक पक्षांचा व वटवाघुळांचा झाडाखाली चिरडून नाहक बळी गेला. त्यामुळे पक्षी प्रेमी आणि नागरिकांमध्ये नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर संबंधित प्रशासनाने जखमी पक्षांवर उपचार करण्याऐवजी त्यांना गडबडीत पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे नागरिकांचे, तथा प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.


मुळ्या कमकुवत झाल्याने झाड कधीही उमळून पडेल अशी अवस्था निर्माण झाली होती. त्यामुळे हजारो परदेशी पक्षांचे आश्रयस्थान असलेले हे झाड योग्य उपाययोजना करण्यासह कसे वाचवता येईल असा प्रयत्न केला पाहिजे अशी मागणी वारंवार होत होती. मात्र एका चुकीच्या निर्णयामुळे सर्व नेस्तनाबुत झाले. याच झाडावर चित्रबलाक पक्षी प्रजननासाठी इंदापूरमध्ये येतात. अनेक पक्षी प्रेमिंचे हे आवडते ठिकाण यामुळेच होते. सध्या अनेक पक्षांची पिले झाडावरून उडून जाण्याच्या अंतिम टप्प्यात होती. मात्र नगरपरिषदेच्या एका चुकीच्या निर्णयामुळे या नवजात परदेशी पाहुण्यांचा नाहक बळी गेला. यामध्ये हजारो स्थानिक वटवाघुळांचाही समावेश आहे. नियमबाह्य पद्धतीने हाताळलेले प्रकरण आणि पक्षांना वाचवण्याचा किंचितही प्रयत्न न केल्याने परदेशी पाहुण्यांचा नाहक जीव गेला. आश्चर्य म्हणजे या संदर्भात वन विभागालाही कोणतीच कल्पना देण्यात आली नसल्याचे वन विभागाच्या एका रेस्क्यू करणाऱ्या कर्मचाऱ्यांने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी तथा पक्षीप्रेमींनी याबाबत वन विभागाला कल्पना दिली. तदनंतर वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली. तब्बल मागील ५ तासांहून अधिक काळ टीम रेस्क्यू करत आहेत. मात्र अजूनही अनेक पक्षी झाडाखाली अडकले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अनेक पक्षांच्या पिलांनी शेजारच्या झाडांवर आश्रय घेतला आहे. तर अनेक पक्षी अजूनही संभ्रमित होऊन आकाशात उडताना दिसत आहेत. या संपूर्ण संतापजनक दुर्घटनेनंतर शहर व तालुक्यातील पक्षी प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत.

घटनेनंतर इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती आक्रमक

या सर्व प्रकारानंतर इंदापूर नागरी संघर्ष समिती आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. घटनेनंतर समितीच्या सदस्यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. जोपर्यंत जबाबदार लोकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत संघर्ष समिती माघार घेणार नाही अशी भूमिका संघर्ष समितीचे सर्वेसर्वा प्रा. कृष्णा ताटे यांनी मांडली आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट