इंदापूर शहरातील ते जीर्ण झाड ठरणार वैष्णवांसाठी धोकादायक


अनेकवेळा लक्ष वेधूनही इंदापूर नगरपरिषदेचे दुर्लक्ष; पालखीपूर्व उपाययोजना करणे आवश्यक

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१४ जून) :- २२ जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी लाखों वारकऱ्यांसह इंदापूर शहरात मुक्कामी येणार आहे. मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इंदापूरमध्ये येणाऱ्या वैष्णवांचा जीव धोक्यात सापडणार असल्याचे दिसत आहे. जुन्या तहसील कचेरी परिसरातील धोकादायक अवस्थेतील चिंचेच्या झाडाकडे नगरपरिषदेच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 

इंदापूर शहरातील मालोजीराजेंच्या गढीच्या ढासळलेल्या काठावर आणि जुन्या तहसील कचेरीच्या उत्तरेस अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील या झाडाच्या मुळ्या माती निघून गेल्याने पूर्ण खुल्या झाल्या आहेत. परिणामी अंदाजे ६०-७० फूट उंच आणि ३०-४० फूट घेरा असलेले अनेक टन वजनाचे हे झाड अतिशय धोकादायक बनले आहे. त्यातच सध्या वादळी वाऱ्याचे दिवस असल्याने हा धोका अधिकच वाढला आहे. झाडाखालूनच दौलतनगर ते रामवेस नाका यांना जोडणारा चांदशाहवली मार्ग आहे. याच मार्गावर अनेक रुग्णालये असल्याने पालखी मुक्कामी असताना अनेक वारकरी रुग्णालयांमध्ये येथूनच ये जा करतात. तर अनेक दिंड्याही झाडाच्या समोरील पटांगणात आश्रय घेत असतात. प्रशासनाने पालखीपूर्व या समस्येवर तोडगा न काढल्यास विठ्ठल भक्तांचा जीव नाहक धोक्यात सापडणार आहे.

यासंदर्भात अनेकवेळा नगरपरिषदेचे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न झाला. मात्र नगरपरिषदेने अद्याप यावर कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. किंतू परंतु भविष्यात विठ्ठल भक्तांच्या अथवा इंदापूरकरांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास याला नगरपरिषदेचा निष्काळजीपणा कारणीभूत असेल हे निश्चित.

टिप्पण्या

  1. याबाबत नगरपालिका पुर्णत: निष्क्रिय आहे। काही अपघात दुर्दैवाने ़झालाच तर नैतिक व, कायदेशीर जबाबदारी त्यांच्यावर च लादली जाईल। सदर झाड व अशीच डझनभर धोकादायक झाडे त्वरित तोडली जाणे है सर्वांच्या च हिताचे आहे।

    उत्तर द्याहटवा
  2. झाड कधीही पडेल अशा अवस्थेत होते. रोज त्या रस्त्याने जाता येता खूप भीती वाटायची. पण प्रशासनाने ते पडण्याऐवजी त्याला वाचवायचे होते. कमीत कमी पक्षी तरी हलवायचे होते जाग्यावरून.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट