मांजावर बंदी इंदापूरमध्ये मात्र सर्रास विक्री; बारामतीमध्ये कारवाई, इंदापूरमध्ये कधी?


समीर सय्यद (उपसंपादक, मुत्सुद्देगिरी)

इंदापूर (२५ जून) : हनुमंत जगदाळे या व्यक्तीचा चायनीज मांजामुळे गळा चिरल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच वेळापूर (ता. माळशिरस) येथे घडली. चायनीज मांजाच्या विक्रीवर बंदी असूनही स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इंदापूर शहरात मात्र या धोकादायक दोऱ्यांची सर्रास आणि खुली विक्री आणि वापर सुरू आहे. मांजा विक्री करणाऱ्या दोघा व्यापाऱ्यांसह पतंग उडवणाऱ्या युवकांवर बारामती पोलीसांकडून काल (२४ जून) कारवाई झाल्याने जीवघेण्या मांजामुळे इंदापूर शहरातील नागरिक गंभीर जखमी झाल्याच्या अनेक घटना होऊनही मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी इंदापूर नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन एखाद्याचा जीव जाण्याची वाट बघत आहे का? असा सवाल इंदापूरकरांना पडू लागला आहे. ही समस्या सर्वांना भेडसावत असली तरी बोलणार कोण? 'कळतं पण वळत नाही' अशी अवस्था इंदापूरकरांची झाली आहे.

पतंग उडवण्याचा खेळ आता केवळ एका सणापुरता मर्यादित राहिलेला नाही. कोरोनामुळे गेली दीड वर्ष सर्व शाळा बंद असल्याने टाईमपाससाठी पतंग उडवणे हा मुलांच्या गरजेचा व जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. पतंग कापाकापीच्या स्पर्धेमुळे अनेक पतंगवीर चायनीज मांजाला अधिक पसंती देतात. परंतु हे चायनीज मांजे अनेकांच्या जीवावर बेतत आहेत. त्यातच बंदी असलेला मांजा इंदापूर शहरातील अनेक दुकानांमध्ये सहज उपलब्ध होत असल्याने इंदापूर शहरातील बहुतांश मुले

आणि एकूणच पतंगवीर पतंग उडवण्यासाठी चायनीज मांजा वापरत असल्याने या मांजामुळे राजेवली नगरमधील एक युवक आणि विद्याप्रतिष्ठानच्या एका कर्मचाऱ्यासह अनेक जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तुटून झाडाला, विजेच्या तारांना अडकलेल्या पतंगाचा मांजा रस्त्यावर लोंबकळताना न दिसल्याने अनेक दुचाकी वाहन चालकांच्या हाताला, चेहऱ्यावर आणि मानेवर गंभीर इजा होत आहेत.

मांजामध्ये धातूच्या भुकटीचा वापर केला जात असल्याने विद्युत तारांना अडकलेला पतंग काढताना विजेच्या झटक्याने लहान मुले दगावण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अनेक पक्षी व प्राण्यांनाही याचा फटका बसत आहे. चायनीज दोरा लवकर तुटत आणि कुजत नसल्याने पर्यावरणासाठीही तो घातक आहे. मात्र, या धोकादायक मांजाची इंदापूर शहरात खुल्या पद्धतीने विक्री आणि वापर सुरू असूनही प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष

केल्याचे व बंदी केवळ कागदावरच असल्याचे दिसत आहे. एका पोलीसालाच मांजा कापल्याने मांजा विक्रेत्यांवर आणि पतंग उडवणाऱ्या युवकांवर बारामतीमध्ये काल (२४ जून) कारवाई झाली. या पार्श्वभूमीवर आता इंदापूरचे नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन कारवाईला कधी धजावणार? का मांजा विक्रेत्यांवर प्रशासन असेच मेहेरबान राहणार? हे बघावे लागणार आहे.

मांजा विक्री, वापर आणि बाळगण्यास मनाई आदेश

मुख्य सचिव पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांनी त्याच्याकडील आदेश क्र. सीआरटी २०१५/सीआर/३७/ टीसी२ दि. ३०/०३/२०१५ अन्वये पर्यावरण संरक्षण कायदा सन १९८६ नुसार प्लास्टिक नायलन आणि सिन्थिटीक मांजाने पक्षी व माणसांना होणाऱ्या दुखपतीपासुन संरक्षण व्हावे याकरिता मांजा जवळ बाळगण्यास आणि त्याचा वापर व विक्री करण्यास मनाई आदेश काढले होते. तसेच उच्च न्यायालयातर्फे वेळोवेळी मांजा विक्री प्रतिबंधाबाबत निर्देश दिलेले आहेत.


टिप्पण्या

  1. खरंच या विषयाकडे खूप गंभीरपणे पाहणे गरजेचे आहे

    उत्तर द्याहटवा
  2. कायध्याचा धाक आता लोकांना राहीलेला नाही। आम्ही लहान असताना पहात होतो-रस्त्यावर पोलिस फौजदार दिसले तरी लोक घाबरत होते,सगळीकडे शांतता असे.आता पोलिसांचा दरारा का वाटत नाही,या बााबत मुळाशी न केलेले बरे! हे सकल शहाणे जन चांगले जाणतात।असो! मात्र, पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर असायलाच हवा, याबाबत कोणाचे(गुन्हेगार)सोडून दुमत नसावे।

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट