पाणी पुरवठा योजनेत केले अनेक मृत कामगारांनी काम; निमगांव केतकीमधील अजब घटना


सचिन देशमाने (निमगाव केतकी)

निमगांव केतकी (२२ जून) :- पाणी पुरवठा योजनेत मयत लोकांनी काम केल्याची अजब घटना या ना त्या माध्यमातून नेहमी चर्चेत असणाऱ्या निमगांव केतकीमध्ये घडली आहे. २०१२-२०१३ मध्ये निमगांव ग्रामपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा समिती मार्फत राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत शेंडेवस्ती येथे झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनेत काम करणाऱ्या ११६ कामगारांपैकी अनेक कामगार हे योजना सुरू होण्याआधीच मृत झाले असल्याचा खळबळजनक दावा समता परिषदेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष दादाराम निवृत्ती शेंडे यांनी केला आहे. सोबतच त्यांनी या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून, दोषींवर कार्यवाही व्हावी यासाठी आजपासून निमगांव ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला आहे.

सविस्तर वृत्त असे की, २०१२-२०१३ साली निमगांव केतकी येथील शेंडेवस्ती याठिकाणी राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत निमगांव ग्रामपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा समितीच्या माध्यमातून नळ पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात आले होते. मात्र आता या योजनेबाबत समता परिषदेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष दादाराम निवृत्ती शेंडे यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. अजब म्हणजे या योजनेत काम केलेल्या ११६ कामगारांपैकी अनेक कामगारांचा योजना सुरू (२०१२-२०१३) होण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचा व अनेक कामगारांनी केवळ कागदावरच काम केला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या योजनेत लाखोंचा (अंदाज पत्रकाप्रमाणे ३४.१७ लक्ष) भ्रष्टाचार झाला असून, दाबनलिकांच्या खोलीमध्ये व टाकीच्या काँक्रीटीकरणामध्ये, योजनेतील विहिरींमध्ये, पाईपांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शेंडे यांनी केला आहे. याप्रकरणी आजीमाजी अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी व दोषीवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी दादाराम शेंडे व समता परिषदेचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आजपासून निमगाव ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला आहे.

सदर योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आपण गेल्या दिड वर्षापासून कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा, पुणे जिल्हा परिषद, पुणे) तसेच गटविकास अधिकारी व उपअभियंता (पंचायत समिती, इंदापूर) यांच्याशी वांरवार पत्रव्यवहार केला आहे. परंतु सदर भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी केली जात असलेली टाळाटाळ पाहता सदर अधिकारी व पाणी समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यामध्ये लागेबांधे निर्माण होऊन त्यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाली असावी.(दादाराम निवृत्ती शेंडे, उपाध्यक्ष, समता परिषद पुणे जिल्हा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट