तर तुमच्यावर गुन्हा दाखल करेन; पिडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याचा ठेकेदाराला सज्जड दम
इंदापूर (२ जून) :- इंदापूर शहराच्या मध्यातून जाणाऱ्या पुणे सोलापूर हायवेवर अनेक अपघातांना कारणीभूत ठरत असलेली खडी परवापर्यंत जैसे थे अवस्थेत दिसली तर 'तुमच्यावर गुन्हा दाखल करेन' असा सज्जड दम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने हायवेच्या डागडुजीचे काम करत असलेल्या संबंधित ठेकेदाराला दिला आहे. हायवेच्या निष्काळजीपणे केल्या जात असलेल्या डागडुजीच्या कामामुळे वाहने घसरून अनेक अपघात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष आणि पत्रकारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता धनंजय वैद्य यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केल्यानंतर वरील प्रकार घडला.
सध्या इंदापूर शहरातून जाणाऱ्या पुणे सोलापूर हायवेवरील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात आहे. मात्र संबंधित ठेकेदाराकडून अत्यंत निष्काळजीपणे करण्यात येत असलेल्या या कामामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या कामात ठेकेदाराकडून कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नसून, निष्काळजीपणे चाललेल्या या कामातील खडी मोठ्या प्रमाणात संपूर्ण रस्त्यावर अस्तव्यस्त पसरल्याने वाहन चालवताना नागरिकांना भलतीच कसरत करावी लागत आहे. वाहने घसरून आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये अनेक नागरिक किरकोळ व काही गंभीर जखमी झाले आहेत. अद्याप जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात होणार नाही याची शास्वती कोण देणार? अथवा तसे झाले तर याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
या गंभीर विषयावर काल (१ जून) कार्यकर्त्यांसह लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय जगताप, दैनिक जनप्रवासचे पत्रकार शिवाजी पवार आणि मुत्सुद्देगिरीचे उपसंपादक व मी मराठी वृत्तवाहिनीचे इंदापूर तालुका प्रतिनिधी समीर सय्यद यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता धनंजय वैद्य यांची भेट घेऊन सदरचा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर वैद्य यांनी त्वरित दखल घेत संबंधित ठेकेदाराला फोनवरून उद्याच्या उद्या खडी उचला, परवा खडी दिसली तर गुन्हा दाखल करेन असा सज्जड भरला. आता पाहावे लागेल की अधिकाऱ्याचा हा दम कोणत्या प्रकारचा होता, अथवा ठेकेदाराने हा दम कितपत गांभीर्याने घेतला.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा