पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये २५ टक्के कपात करावी; इंदापूरमधील एमआयएम कार्यकर्त्यांची मागणी
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (१८ जून) :- 'कोरोना काळ त्यावर इंधनाची दरवाढ' अशा दुहेरी दुश्चक्रात अडकलेल्या जनतेला केंद्र व राज्य शासनाने इंधनावरील कर कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या एका निवेदनाच्या माध्यमातून इंदापूर शहरातील एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी आज केली आहे. जीवनावश्यक वस्तूत गिणती होत असलेले पेट्रोल सध्या शंभरीपार तर डिझेल शंभरीजवळ पोहोचल्याने सामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडत असलेल्या इंधनाच्या करांमध्ये कपात करून इंधनाच्या किंमतींमध्ये २५ टक्क्यांपर्यंत कपात करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
गतवर्षी जगभरात लागलेल्या लॉकडाऊनमुळे तेलाची आंतरराष्ट्रीय मागणी कमी झाल्याने तेलाचे दर अक्षरश: कोसळले होते. या परिस्थितीत भारतात मात्र सलग ८२ दिवस तेल कंपन्यांनी इंधनांचे दर स्थिर ठेवले होते. आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असताना शासन बरोबरीने करही वाढवत असल्याने इंधन
दरवाढीचा डबल फटका ग्राहकांना बसतो आहे. भारतीयांना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याचा फायदाही मिळाला नाही, उलट वर्षभरानंतर दरवाढीचा फटका मात्र जोरदार बसला आहे, त्यामुळे 'कोरोना काळ त्यावर इंधन दरवाढ' अशा दुहेरी दुश्चक्रात अडकलेल्या नागरिकांना ही दरवाढ भलतीच खुपत असल्याचे दिसत आहे.
सध्या पेट्रोल व डिझेलची गिणती जीवनावश्यक वस्तूंमध्ये होत असतानाही, केंद्रशासन मात्र एका लिटर पेट्रोलमागे जवळपास ३३ रुपये आणि डिझेलमागे जवळपास ३२ रुपये एवढे उत्पादन शुल्क (एक्साइज ड्युटी) आकारत आहे जे इंधनाच्या मूळ किंमतीपेक्षाही अधिक आहे. तर राज्यसरकार एका लिटर पेट्रोलमागे २५ टक्के आणि डिझेलमागे २२ टक्के रक्कम व्हॅटच्या नांवावर आकारात आहे. विशेष म्हणजे केंद्राने जवळपास १३ वेळा एक्साइज ड्युटी वाढवली आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने पेट्रोल व डिझेलवरील कर कमी करून लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी इंदापूर शहरातील एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी आज तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारला केली आहे. यावेळी, आझम पठाण, स्वालेद कोरबू, अख्तर मुलाणी आणि अरबाज पठाण उपस्थित होते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा