इंदापूरात प्रशासनाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारणारं इथे कुणीच नाही...म्हणूनच
संपादकीय
इंदापूर प्रशासनाच्या बे-जबाबदार अधिकाऱ्यांनो...! बे'चा अर्थ इथे अधिक कर्तव्यदक्ष असा घ्या तुम्ही. सायनाच्या मृत्यूला कारणीभूत परिस्थितीला एका वर्षानंतरही जैसे थे ठेवण्यासाठी तुमचा निषेध करावा, का संपूर्ण देशभरात हीच परिस्थिती आहे म्हणून स्वतःची समजूत काढावी हेच कळेना. १० डिसेंबर २०२२ रोजी आय कॉलेजसमोर उसाच्या भरधाव ट्रॅक्टरने सायना लिके हिला चिरडले होते. वर्ष उलटले या दुर्दैवी घटनेला. असे कितीही चिरडले गेले तरी इंदापूरात तुमचं कुणीच काही वाकडं करू शकत नाही याचा अंदाज आल्यानेच संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करताय तुम्ही? ना कायदा, ना लोकं, ना लोक प्रतिनिधी, ना कोणता पक्ष, ना कोणती संघटना. तुम्हाला जाब विचारणारं, तुमच्या कर्तव्यात दक्षतेची मागणी करणारं इथे कुणीच नाही म्हणून फावतंय. केवळ करिअर म्हणून नव्हे तर देशसेवा करण्याच्या प्रामाणिक हेतूने प्रशासकीय सेवेत येणाऱ्यांचा काळ आता संपलाय हे तुम्हाला बघून पटू लागलंय.
लाखोंची शास्ती आणि बेहिशेबी लगान घेत असल्याचे आरोप करत नागरिक नगरपरिषदेविरोधात मागील अनेक महिन्यांपासून लोकशाही मार्गाने लढा देत आहेत. मात्र नगरपरिषद प्रशासनाला किंचितही फरक पडत नाही. सगळे राम भरोसे. बेमाप कर आणि शास्ती घेऊनही नगरपरिषद अपघाताला कारणीभूत फुटपाथवरील बेकायदेशीर अतिक्रमणाकडे केवळ १०-२० रुपयांसाठी दुर्लक्ष करताना दिसत आहे. परिणामी पादचारी बच्चे, बुढे सर्वांना भरधाव गाड्यांच्या गर्दीत जीव मुठीत घेऊन चालायचा नाईलाज होतोय. फुटपाथ आहेत नेमके कशासाठी, कोणासाठी? अनेकांचे जीव गेले, जातील, वाहतुकीला अडथळा होतोय म्हणून तक्रार द्यावी, का फुटपाथ अनेकांना रोजगार देताहेत म्हणून नगरपरिषदेचे आभार मानावे?. सायनाच्या अपघातानंतर पोलीस प्रशासनाने बेशिस्त पार्किंगवर कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे हायवेवरील बेशिस्त पार्किंगला किंचित आळा बसला. "देर आए दुरुस्त आए" पोलीस प्रशासनाचे आभार. मात्र नियमांना धाब्यावर बसवत पोलीस ठाण्यासमोरूनच दिवस रात्र होणाऱ्या धोकादायक ऊस वाहतूकीवर कारवाई का होत नाही असा प्रश्न सामान्यांना पडणं साहजिक आहे. आवश्यक ठिकाणी गतिरोधक करा या लोकमागणीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नियमांचे हवाले देतात. मात्र भ्रष्टाचारयुक्त रस्त्यांच्या कामात कोट्यवधी रुपये मातीमोल होताना नियम कुठे जातात? सुरक्षा सप्ताह'च्या कार्यक्रमात आरटीओ आमदारांसह फोटो सेशन करतात. मात्र शेजारीच उभ्या असलेल्या ओव्हरलोड आणि नियमबाह्य पद्धतीने भरलेल्या उसाच्या ट्रॉल्यांकडे आरटीओ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, मग त्यांना शहरातून धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक करणारे, ट्रॅक्टर, बजाट कसे दिसतील.
सायनाच्या अपघातानंतर 'जड वाहनास प्रवेश बंद' हा फलक नगरपरिषद आणि सां.बा. विभागाने संयुक्तपणे शहराच्या बॉन्ड्रीवर लावला होता. मात्र कारवाई अभावी अवजड वाहतूक आजही शहरातून बिनधास्तपणे सुरूच आहे. कुत्र्याविना "कुत्र्यापासून सावधान" या पाटीला कोणी घाबरतं का? प्रशासनाचे हे भ्रष्ट-आचार इंदापूरकरांपासून लपलेले नाहीत. मात्र दुर्दैव... जाब विचारण्याची, बोलायची हिम्मत इंदापूरकरांमध्ये नाही. अतिक्रमण २४ तासांत हटवण्याचं अल्टिमेटम नगरपरिषद प्रशासनाने दिलं होतं. मात्र हे तात्पुरते नाटक सिद्ध झाले. अपघातात आणखी एखादा मेला तर बघू असा विचार प्रशासन करत असावे कदाचित. कर्तव्याचा आत्मा मेलाय हो सर्वांचा. निर्भिड, कर्तव्यदक्ष होऊन संविधान व कायद्याप्रती प्रामाणिक, सच्चा भारतीय होऊन काय मिळतं. मुंडेंसारखा प्रामाणिकपणाचा कटोरा घेऊन उगीच गावोगावी हिंडत बसावं लागतं, असा विचार तर हे अधिकारी करत नसतील ना? मरायचं त्याला मरू द्या ओ. यांचं मस्त चाललंय. वर्षातून दोन वेळा झेंडा फडकवला, एकदा भारत माता की जय म्हटलं की देश आणि कर्तव्याप्रती कितीही अप्रामाणिक, बेजबाबदार वागलं तरी चालतं?
इंदापूरकरांनो ! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात याआधीही अनेक अपघात झाले आहेत, किती जण अवजड वाहने आणि उसाच्या ट्रॅक्टरखाली चिरडले गेले आहेत. ११ ऑक्टोबर २०२० रोजी बाबा चौकात अडीच वर्षाचा आदित्य साठे ट्रक खाली चिरडला गेला होता. त्याआधी बस स्थानकासमोर, टेलिफोन एक्सचेंजसमोर अशाच अपघातात अनेक निष्पाप जिवानिशी गेले. २० फेब्रुवारी २०२२ च्या मध्यरात्री टेलिफोन एक्सचेंजसमोर उसाची अख्खी ट्रॉली चारचाकीवर उलटली होती. सायनाच्या अपघातापूर्व दोन दिवस आधी ८ डिसेंबरला अशाच एका घटनेत कित्येक टन ऊस टेंभूर्णी नाक्यावर पसरला होता. तर सायनाच्या अपघाताच्या सेम डे बाबा चौकात ओव्हरलोड उसाच्या ट्रॅक्टरखाली अनेकजण चिरडता चिरडता राहिले होते. अशा हजारो घटना इथे घडल्या आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुढेही घडतील. या गोष्टी किती वेळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यायच्या? बस स्थानक, शासकीय कार्यालये, रुग्णालये, आठवडे बाजार, स्कूल, कॉलेजमुळे हजारो विद्यार्थ्यांची, वृद्धांची, नागरिकांची वर्दळ असते इथे. परंतु अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या असं का वाटत नाहीत प्रशासनाला?
उज्वल भविष्य घडविण्यासाठी सायना चिमुरड्या वयातच इंदापूरमध्ये आली होती. मात्र प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे, संबंधित अधिकाऱ्यांच्या दक्षता विरहित कर्तव्याच्या परिणामी तिची स्वप्ने ट्रॅक्टरखाली चिरडून इंदापूरकरांच्याच साक्षीने रक्तबंबाळ झाली होती. बेधुंद त्या उसाच्या ट्रॅक्टरवाल्यावर गुन्हा दाखल झाला, एवढीच काय त्या दुर्दैवी घटनेची दखल. ड्रायव्हिंग लायसन्स असलं की माणसं मारायची अलिखित मुभा असते? एका दिवसात जामीन झाला त्याला. किंतु परंतु अपघातास कारणीभूत समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे शाबूत राहिले. आणि हो ! आश्रमात वाढणाऱ्या सायनासारख्या मजुराच्या मुलीसाठी गॅझेटेड ऑफिसरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी/हिम्मत तरी कोण करणार?
सायनाच्या अपघातानंतर अपवाद वगळता प्रशासनाविरोधात अल्पशी कृती करण्याची हिंमतही कोणी केली नाही. अफसोस ! अपघाताच्या कारणांची मीमांसा करण्याइतपत समज, 'सायना आपली मुलगी असती' तर हा विचार करून भावनाविवश होणारं मन, समस्या सुटाव्यात म्हणून पाठपुरावा करण्याइतपत वेळ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना बेजबाबदार का वागता म्हणून जाब विचारण्याची हिम्मत इंदापूरकरांमध्ये नाही. सोईस्कर राजकारण करणारी नेते मंडळीही संबंधित समस्यांवर "ब्र" शब्द काढत नाहीत. एरव्ही विकास कामांच्या श्रेयासाठी तू तू मैं मैं करणाऱ्या आजी माजींनाही विचारणं आहे...अपघाताला कारणीभूत समस्या दूर व्हाव्यात म्हणून तुमची चढाओढ, तू तू मैं मैं कधी पाहायला मिळेल? ज्यांचे कारखाने, ज्यांच्या कारखान्याचे ते ट्रॅक्टर तेच सायनाच्या अपघातानंतर अवजड वाहतूक शहरातून बंद करा म्हणून निवेदन द्यायला पुढे होते. नंतर या विषयावर जीभ उचलली नाही त्यांनी.
शेवटी हेच म्हणावसं वाटतं... सायनाचा तो अपघात नव्हताच, ती हत्याच होती. भ्रष्ट प्रशासन, बेजबाबदार अधिकारी, निष्क्रिय लोक प्रतिनिधी आणि समस्यांचं ओझ गाढवासारखं पाठीवर मुकाट्याने वागवणाऱ्या इंदापूरकरांनी केलेली. समस्यांवर कोणी बोलायचं नाही, जो बोलतो त्याला एकटं पाडायचं, विरोध करून त्यालाच अडचणीत आणण्याचे प्लॅन करायचे, समस्यांचा बळी कोणी ठरला की वरवरची हळहळ व्यक्त करायची, निरुद्देश चर्चा करायच्या, फेसबुक आणि व्हॉट्सॲप पोस्ट रंगवायच्या, नेत्यांनी सांत्वनपर भेटी देऊन मोकळं व्हायचं, माध्यमांनी बातम्या झळकवायच्या, संघटनांनी निवेदने देऊन बाजूला व्हायचं, यापलीकडे ठोस असं कुणी काहीच केलेलं नाही. इंदापूरकरांनो ! अपघाताला कारणीभूत ठरणारे हायवेवरील पार्किंग, फूटपाथवरील अतिक्रमण, अवजड वाहतूक, धोकादायक ऊस वाहतूक या जीवघेण्या समस्यांवर बोला काही. प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारा. ते आपल्या सेवेसाठी आहेत, मालक नाहीत ते आपले. बेजबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारणारं इथे कुणीच नाही... म्हणूनच या समस्या अजून समस्या आहेत. याच समस्यांमुळे अपघातात उद्या सायनसारखा तुमच्याच घरातल्या कोणाचा जीव गेला तर बोलून काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे आजच बोला. किमान सायनाला श्रद्धांजली म्हणून तरी बोला.

आपले म्हणणे १००% खरे आहे! आपले कायदे बेलाशक सक्षम आहेत, पण, या कायद्यानुसार योग्य ती कारवाई करणारी यंत्रणा सक्षम राहिलेली नाही। कारण, त्यांनाच कायद्याची भिती वाटत नाही। सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे। चिरीमिरी घेतल्याशिवाय वेळेत काम होत नाही। सगळीकडे 'अभद्र युती' आहे, असे दृश्य पहावयास मिळते।लोकांना कायद्याची भिती वाटत नाही। लोकांचा दर्जा, (आर्थिक, सामाजिक, जातीय, धार्मिक, राजकीय) पाहुन कारवाई केली जाते, असे चित्र आहे। सामान्य माणसाला कुणी वाली ऊरला नाही।एकमेव परमेश्वरच त्यांचा वाली आहे।
उत्तर द्याहटवा